Belgaum Maharashtra Karnataka Border Issue: कर्नाटक विधानसभा अधिवेशनाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजिलेल्या महामेळाव्याची धास्ती घेत प्रशासनाने लागू केलेला जमावबंदीचा आदेश धुडकावत बेळगावमधील मराठी भाषकांनी रस्त्यावर उतरत घोषणाबाजी करीत सोमवारी आंदोलन केले. त्यानंतर समितीच्या सुमारे ७८ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेचे पडसाद विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात उमटले. उद्धवसेनेच्या आमदारांनी पायऱ्यांवर आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी केली. तर विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निषेध नोंदवत महाराष्ट्र सरकार सीमावर्ती भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही दिली. यातच ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भूमिका मांडत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहून मोठी मागणी केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल मी आपले अभिनंदन करतो. आजच सभागृहामध्ये प्रथेप्रमाणे आपला परिचय झालेला आहे. त्याबद्दल सर्व सदस्यांनी आपले अभिनंदन ही केलेले आहे. आपल्याला माहीत असल्याप्रमाणे बेळगाव आणि कारवारचा प्रश्न गंभीर होत आहे. या प्रश्नी मराठी माणसांना न्याय देणे किती गरजेचे आहे हे आपण जाणताच. बेळगाव कारवार प्रश्न बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे. मी आपणास कळकळीची विनंती करत आहे की बेळगाव कारवार प्रश्नी आपण मराठी माणसाला न्याव द्यावा. आपण सभागृहामध्ये मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी बेळगांव कारवार हा केंद्रशासित प्रदेश करण्याचा ठराव घ्यावा आम्ही एक मताने या ठरावास पाठिंबा देऊ. बेळगाव केंद्रशासित करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे लवकरात लवकर पाठवावा आणि बेळगाव केंद्रशासित करण्यासाठी प्रयत्न करावेत, ही विनंती, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
मराठी माणसावरील अन्याय आम्ही सहन करू शकत नाही
बेळगावमधील मराठी माणसावरील अन्याय, अत्याचार आणि अपमान आम्ही सहन करू शकत नाही. केंद्र सरकारने बेळगाव परिसरात जास्त निधी देऊन विकास करण्याचे आश्वासन दिले होते. सरकार कुणाचेही असले तरी अन्याय सहन करणार नाही. न्यायालयात बेळगाव प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत तो परिसर केंद्रशासित करावा ही आमची कायम भूमिका आहे. मराठी माणूस लाडका आहे की, नाही हे सरकारने दाखवून द्यावे. मराठी माणसावरील अन्याय दूर करण्याबाबत सरकारने भूमिका मांडावी, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले होते.
बेळगाव हा मराठी अस्मितेचा अविभाज्य भाग आहे
बेळगावात होत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महाअधिवेशनाला कर्नाटक सरकारने परवानगी तर नाकारलीच, त्यावर बेळगावात संचारबंदीही लागू केली. सीमाही बंद केल्या जात आहेत. मराठी माणसांवरच्या ह्या अन्यायाचा तीव्र निषेध! बेळगाव हा मराठी अस्मितेचा अविभाज्य भाग आहे आणि राहणारच! माझे कर्नाटकातल्या सरकारला आवाहन आहे, की त्यांनी मराठी माणसांवरचा हा अन्याय तातडीने थांबवावा! महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितापेक्षा मोठे काहीही नाही!, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
दरम्यान, हे बालिश विधान आहे. आमच्यासाठी महाजन अहवाल अंतिम आहे. त्यामुळे आम्हीसुद्धा काही मागू नये आणि त्यांनीही मागू नये. बेळगावला केंद्रशासित प्रदेश कसा घोषित करता येईल? आणि, महाराष्ट्र एकीकरण समितीने आंदोलन केल्यास आम्ही गप्प बसणार का? असा पलटवार कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे.