Join us  

Aaditya shirodkar MNS : ... म्हणून काल शिवसेनेत प्रवेश केला, आदित्य शिरोडकरांचं 'मनसे' स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 2:51 PM

काही महिन्यांपूर्वीच मनसेनं संघटनात्मक मजबुतीला सुरूवात केली होती. प्रमुख महानगरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी लोकसभा मतदारसंघनिहाय पथक तयार करण्यात आलं.

ठळक मुद्देएकाच पक्षात काही नेत्यांमध्ये मतभेद होतात, पण कालांतराने ते वाढतच गेले, अखेर संयम संपल्यानंतर मी काल शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे आदित्य शिरोडकर यांनी मनसे स्पष्टीकरण दिलं. 

मुंबई - आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मनसेला पुन्हा एकदा शिवसेनेने जबर धक्का दिला आहे. मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर(MNS Aditya Shirodkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या(CM Uddhav Thackeray) उपस्थितीत शिवबंधन हाती बांधलं आहे. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई उपस्थित होते. आदित्य शिरोडकर यांच्या अचानक पक्ष सोडण्याने मनसेला धक्का बसला आहे. आता, आपल्या शिवसेना प्रवेशाचे राजकारण त्यांनीच सांगितलं आहे. 

काही महिन्यांपूर्वीच मनसेनं संघटनात्मक मजबुतीला सुरूवात केली होती. प्रमुख महानगरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी लोकसभा मतदारसंघनिहाय पथक तयार करण्यात आलं. यात एक मनसे नेता आणि सरचिटणीस असा समावेश करण्यात आला होता. यात मुंबईतल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील जबाबदारी आदित्य शिरोडकर यांच्यावर सोपवण्यात आली होती. तर मनसेच्या शॅडो कॅबिनेटमध्ये आदित्य शिरोडकर यांच्यावर उच्च शिक्षण विभागाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर आदित्य यांनी मनसेला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला. याबाबत एबीपी माझाशी बोलताना त्यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची कार्यपद्धती पाहून, त्यांच्या कामापासून प्रेरीत होवून मी शिवसेनेत प्रवेश घेतला, असे आदित्य शिरोडकर यांनी म्हटलंय. मनसेच्या स्थापनेपासून 2012 ची विधानसभा असेल किंवा त्याही पुढील निवडणुका असतील. एकाच पक्षात काही नेत्यांमध्ये मतभेद होतात, पण कालांतराने ते वाढतच गेले, अखेर संयम संपल्यानंतर मी काल शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे आदित्य शिरोडकर यांनी मनसे स्पष्टीकरण दिलं. राजकारणात काही तत्त्व असतात, ते पाळले पाहिजेत. वैयक्तिक राजकीय विषय आहेत, ते प्रसारमाध्यमांसमोर बोलणं चुकीचं होईल, म्हणून मी जास्त खोलात जात नाही, असेही शिरोडकर यांनी म्हटलं. 

आदित्य शिरोडकर आणि बाळा नांदगावकर यांच्यात झाला होता वाद

मागील वर्षी २३ जानेवारीला मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण आणि पक्षाचं पहिलं अधिवेशन मुंबईत पार पडलं होतं. त्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी मनसेने मुंबईतील राजगड कार्यालयात बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये बाळा नांदगावकर यांनी एका दिलेल्या मुलाखतीत पक्षाचे नेते, महिला, विद्यार्थी आणि कामगार संघटना पक्षाच्या वाढीसाठी कमी पडलो असल्याचं वक्तव्य केलं होतं. बाळा नांदगावकरांच्या या विधानावरुनच आदित्य शिरोडकर आणि बाळा नांदगावकर यांच्यात शाब्दिक वाद झाला होता. मुंबईतल्या सर्व पदाधिकारी आणि नेत्यांसमोर हा प्रकार घडल्याने पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला होता. 

टॅग्स :शिवसेनामनसेआदित्य ठाकरेमुंबई