Join us  

फेसबुकवर मैत्री, ‘ऐश्वर्या’ने घातला पाच लाखांचा गंडा; माहीममधील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 10:22 AM

गुंतवणुकीच्या नावाखाली प्रकार.

मुंबई : फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मैत्री करत गुंतवणुकीच्या माध्यमातून एका महिलेने बँकेत काम करणाऱ्या वरिष्ठ लिपिकाला पाच लाख ४० हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार माहीममध्ये घडला आहे. याप्रकरणी ऐश्वर्या शेट्टी नावाच्या महिलेविरोधात गुन्हा नोंदवत, माहीम पोलिस अधिक तपास करत आहेत.

माहीम परिसरात राहणारे ५१ वर्षीय तक्रारदार हे एका  बँकेमध्ये वरिष्ठ लिपिक पदावर नोकरी करतात. १३ मार्चला त्यांना ऐश्वर्या शेट्टी नावाच्या महिलेने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. मागचा पुढचा विचार न करता तक्रारदार यांनी ती फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. त्यानंतर ऐश्वर्याने फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून तक्रारदार यांच्याशी गप्पा मारण्यास सुरुवात केली. काही दिवसांनी तिने तक्रारदार यांना यूएस डॉलर्समधील ट्रेडिंगबाबत (यूएसडीटी) माहिती सांगत यूएसडीटी प्लॅटफार्मवरून न्यू माँटगोल्ड कॅपिटल ही कंपनी यूएसमध्ये गोल्ड माइंनिग संदर्भात काम करत आहे. 

या कंपीनीच्या माध्यमातून सोन्यामध्ये गुंतवणूक करून चांगला नफा मिळवून  देण्याचे आमिष तिने तक्रारदार यांना दाखवले. पुढे, दोघांनी एकमेकांना आपले मोबाइल नंबर देत व्हॉट्सॲप चॅटिंगच्या माध्यमातून बोलणे सुरू झाले.

गुंतवणुकीसंदर्भात बोलणे सुरू असताना ऐश्वर्याने ३१ मार्चला व्हॉट्सॲप बंद केले. चार दिवसांनी तिने पुन्हा अन्य एका नंबरवर व्हॉट्सॲप सुरू करत तक्रारदारांना एक लिंक पाठवली. त्यात नोंदणी करण्यास सांगत सुरुवातीला ४० ते ५० हजार रुपयांची गुंतवणूक करण्यास सांगितले. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन तक्रारदार यांनी ४० हजार रुपयांची गुंतवणूक केली. श्रीराम थेटरर्स प्रा. लि नावाने आयसीआयसी बँकेत असलेल्या खात्यावर घेण्यात आली होती. 

१) पुढे, तिने तक्रारदार यांना पाच लाख रुपये गुंतवण्यास सांगितले. तक्रारदार यांनी काहीही खातरजमा न करता पाच लाख रुपये गुंतवले. ही रक्कम पीएनबी बँकेतील एव्हरग्रीन कार रेंटल नावाच्या खात्यावर घेण्यात आली होती. 

२) १० एप्रिलला तक्रारदार यांनी गुंतवणूक केलेली लिंक ओपन करण्याचा प्रयत्न केला. पण, लिंक ओपन झाली नाही. ऐश्वर्यासुद्धा नॉट रिचेबल झाल्याने आपली फसवणूक झाल्याची तक्रारदार यांची खात्री पटताच पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीपोलिस