Join us

सणासुदीत कर्ज वितरणात घसघशीत वाढ; गृह व वाहन कर्जाला मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 07:32 IST

१९ टक्क्यांनी झाली वाढ

मुंबई : गेल्या पाच महिन्यांत विविध कर्जांवरील व्याजदरात १.९० टक्क्यांची घसघशीत वाढ झाली असली तरी सरत्या दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी मोठ्या प्रमाणावर कर्जाची उचल केल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून समोर आली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कर्जाच्या उचलीमध्ये १९.६ टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे.

शिखर बँकेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, कर्ज वितरणामध्ये सर्वाधिक वाढ ही गृह कर्ज तसेच वाहन कर्ज या कर्ज प्रकारांत झाली आहे. याचसोबत वैयक्तिक कर्जामध्येही वाढ नोंदली गेली आहे. यंदाच्या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीमध्ये या तिन्ही कर्ज प्रकारांत मिळून एकूण ३ लाख २० हजार ३०७ कोटी रुपयांच्या कर्जाचे वितरण देशातील विविध बँका व बिगर बँकिंग वित्तीय संस्थांतर्फे करण्यात आले.

गेल्या वर्षात या तीन घटकांतील कर्ज वितरणाचा आकडा हा ९७ हजार ७१० कोटी रुपये इतका होता. गृह, वाहन व वैयक्तिक कर्जानंतर झपाट्याने विकसित होणाऱ्या सेवा क्षेत्रामधील कर्जाच्या उचलीने दुसरा क्रमांक गाठला आहे. गेल्यावर्षीच्या ९० हजार ८९८ कोटी रुपयांच्या कर्ज उचलीच्या तुलनेत यंदा सेवा क्षेत्राकडून सप्टेंबरपर्यंत तब्बल २ लाख ४ हजार ९०५ कोटी रुपयांच्या कर्जाची उचल झाली आहे.

कृषी क्षेत्रामध्ये ९९ हजार कोटींची उचल

तिसऱ्या क्रमांकावर कृषी आणि अन्य उद्योग आहेत. या क्षेत्रामध्ये ९९ हजार ८१८ कोटी रुपयांची उचल झाली आहे. तर याखेरीज, लघू, मध्यम व मोठ्या उद्योगांकडून होणाऱ्या कर्जाच्या उचलीमध्ये देखील वाढ नोंदली गेली आहे. गेल्या संपूर्ण वर्षामध्ये कोरोना आणि लॉकडाऊनमुळे या कर्ज वितरणाचे प्रमाण अवघे १.६ टक्के होते. त्यामध्ये लक्षणीय वाढ होत यंदा जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीमध्येच १२.६ टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे. यापोटी एकूण ८४ हजार ७५० कोटी रुपयांच्या कर्जाचे वितरण झाले आहे.

टॅग्स :सुंदर गृहनियोजन