सिद्धिविनायकाच्या भाविकांसाठी पालिकेचा विशेष प्रकल्प; परिसरातील रस्ता रुंदीकरणासह दर ५ मिनिटांनी मिनी बस सेवा उपलब्ध होणार

By सीमा महांगडे | Published: January 29, 2024 06:53 PM2024-01-29T18:53:28+5:302024-01-29T18:55:37+5:30

मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिर परिसरात पालिकेकडून भाविकांसाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

A special project of the municipality for the devotees of Siddhivinayak Mini bus service will be available every 5 minutes along with road widening in the area | सिद्धिविनायकाच्या भाविकांसाठी पालिकेचा विशेष प्रकल्प; परिसरातील रस्ता रुंदीकरणासह दर ५ मिनिटांनी मिनी बस सेवा उपलब्ध होणार

सिद्धिविनायकाच्या भाविकांसाठी पालिकेचा विशेष प्रकल्प; परिसरातील रस्ता रुंदीकरणासह दर ५ मिनिटांनी मिनी बस सेवा उपलब्ध होणार

मुंबई: मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिर परिसरात पालिकेकडून भाविकांसाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पात भाविकांना ये-जा करण्यासाठी स्वतंत्र रस्ता, रस्ते रुंदीकरण, मंदिराच्या दोन्ही मार्गावर प्रवेशद्वार, अत्याधुनिक स्वच्छतागृह आदी सुविधांचा समावेश असणार आहे. मंदिराभोवती सद्यस्थितीत पूजा साहित्य विक्रेत्यांमुळे प्रवेशद्वाराजवळ गर्दी होत असते. ही गर्दी टाळण्यासाठी पूजा साहित्य विक्रेत्यांचे स्थलांतर दुसऱ्या मार्गावर करण्याचे प्रस्तावित असून मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांसाठी स्वतंत्र रस्ता या प्रकल्पांतर्गत तयार करण्यात येणार आहे. यामुळे भाविकांना सिद्धिविनायकाच्या दर्शनाचा लाभ शांततेत आणि व्यवस्थित पद्धतीने घेता येणार आहे.

सिद्धिविनायक मंदीर हे महाराष्ट्रासह देशभरातील प्रमुख आणि प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक धार्मिक स्थळ आहे. मंदिरात लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनाकरिता येतात. त्यामुळे भाविकांसाठी या उपाययोजना हाती घेण्यात येत असून, लवकरच या कामांना सुरुवात होणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प सुरू होणार आहे.

या विशेष प्रकल्पात मंदिराच्या दोन्ही मार्गावर भव्य प्रवेशद्वार उभारणे, अत्याधुनिक स्वच्छतागृह तयार करणे, दिव्यांग, गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी दर्शन रांगेत तात्पुरती बसण्याची व्यवस्था, ऊन-पावसापासून संरक्षण मिळावे याकरिता छत, मंदिराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांचे रुंदीकरण, भाविकांसाठी वाहनतळ, मंदिराच्या सुरक्षिततेसंबंधी उपाययोजना, मंदिराजवळील नवीन मेट्रो स्थानकापासून मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी वाढीव सुविधा तयार करणे, दादर रेल्वे स्थानक (पश्चिम) ते सिद्धिविनायक मंदिर दरम्यान दर ५ मिनिटाला ‘बेस्ट’तर्फे मिनी बस चालविणे आदी कामांचा या विशेष प्रकल्पात समावेश आहे.
 
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सल्लागाराची नेमणूक
मंदिरात येणाऱ्या भाविकांना उच्चतम दर्जाच्या सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेमार्फत ‘स्वारस्याची अभिव्यक्ती’ मागवून आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार/वास्तुशास्त्रज्ञ यांची निवड करण्यात येणार आहे. प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार/वास्तुशास्त्रज्ञ यांनी दिलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालावर निर्णय घेण्यासाठी श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासचे अध्यक्ष व आमदार सदा सरवणकर आणि उपायुक्त रमाकांत बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. जी उत्तर आणि जी दक्षिण या दोन्ही विभागांचे सहायक आयुक्त, पालिकेचे वास्तुविशारद त्याचप्रमाणे विकास नियोजन विभागाचे प्रमुख अभियंता, रस्ते व वाहतूक विभागाचे प्रमुख अभियंता इमारत बांधकाम विभागाचे नगर उप अभियंता या विभागांचे अधिकारी या प्रकल्पाचे कामकाज पाहणार आहेत.

Web Title: A special project of the municipality for the devotees of Siddhivinayak Mini bus service will be available every 5 minutes along with road widening in the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.