दादरमध्ये दाम्पत्याच्या मृत्यूने खळबळ; कर्जाला कंटाळून पत्नीची हत्या करत आत्महत्या
By मनीषा म्हात्रे | Updated: February 9, 2023 19:20 IST2023-02-09T19:19:43+5:302023-02-09T19:20:19+5:30
दादरमध्ये राहत्या घरातून दाम्पत्याचे मृतदेह मिळून आल्याने गुरुवारी खळबळ उडाली आहे.

दादरमध्ये दाम्पत्याच्या मृत्यूने खळबळ; कर्जाला कंटाळून पत्नीची हत्या करत आत्महत्या
मुंबई: दादरमध्ये राहत्या घरातून दाम्पत्याचे मृतदेह मिळून आल्याने गुरुवारी खळबळ उडाली आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या सुसाईट नोटमध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून पत्नीची हत्या करत आत्महत्या करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी दादर पोलीस अधिक तपास करत आहे.
दादरच्या सेनापती बापट मार्गावरील केशरी पत्रावाला चाळमध्ये विनोद वसंत समजीस्कर (४३) हे पत्नी शुभांगी (४०) आणि मुलीसोबत राहण्यास होते. ते खासगी कंपनीत नोकरी करायचे. तर, पत्नी गृहिणी होत्या. त्यांची मुलगी अकरावी इयत्तेत शिक्षण घेत आहे. गुरुवारी सकाळी साडे सातच्या सुमारास मुलगी नेहमीप्रमाणे कॉलेजसाठी बाहेर पडली. गुरुवारी दुपारच्या सुमारास शुभांगी या कॉल उचलत नसल्याने त्यांच्या भावाला संशय आला. त्यांनी, जवळच्या नातेवाईकाला घरी जाऊन बहिणीशी बोलणे करून देण्यास सांगितले. मात्र, घराचा दरवाजा बंद होता. आतूनही काहीही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांना संशय आला. त्यापाठोपाठ मुलगी घरी आल्यानंतर दोघेही बेशुद्धावस्थेत पडलेले दिसून आले. त्यांच्या जवळ मिळालेल्या नोटमध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून पत्नीची हत्या करत आत्महत्या करत असल्याचे नमूद केले होते. घटनेची वर्दी लागताच दादर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोघांनाही जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे दाखल करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले आहे. दोघांचाही विष प्राशन करून मृत्यू झाल्याचे समोर येत आहे.
दोघांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश मुगुटराव यांनी सांगितले. दोघेही दाम्पत्यामध्ये कधीच भांडण नव्हते. शिवाय ते सर्वाशी हसून खेळून राहत होते. त्यांच्या कर्जाबाबतही नातेवाईकांना माहिती नसल्याचे शेजारी, नातेवाईकांच्या चौकशीतून समोर येत आहे. त्यामुळे पोलीस सर्व बाजूने तपास करत आहे.