हँकॉक पुलाचा एक भाग १० वर्षांनंतरही अर्धवटच; बाधितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटता सुटेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 14:09 IST2025-10-13T14:08:54+5:302025-10-13T14:09:03+5:30
...त्यामुळे हा पूल पूर्ण होऊन आम्हाला कधी दिलासा मिळेल, असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत.

हँकॉक पुलाचा एक भाग १० वर्षांनंतरही अर्धवटच; बाधितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटता सुटेना
महेश पवार -
मुंबई : सॅण्डहर्स्ट रोड स्थानकाजवळील हँकॉक पूल २०२५ साल संपत आले, तरी अर्धवट अवस्थेत आहे. पुलाची एक बाजू वाहतुकीसाठी खुली केली असली, तरी दुसरी बाजू म्हाडाच्या इमारती व परवान्यांच्या कचाट्यात अडकली आहे. त्यामुळे हा पूल पूर्ण होऊन आम्हाला कधी दिलासा मिळेल, असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत.
मध्य रेल्वेने २०१६ मध्ये धोकादायक म्हणून हा पूल पाडला. २०१९ पर्यंत नवा पूल पूर्ण केला जाईल, असे सांगण्यात येत होते. मात्र इन्फिनिटी आउट टॉवरपासून सुरू झालेल्या पूल बांधणीच्या पहिल्या टप्प्यातील पहिला गर्डर जुलै २०२० मध्ये टाकण्यात आला. जानेवारी २०२१ मध्ये पुलाची एक बाजू वाहतुकीसाठी खुली केली. तर, दुसऱ्या टप्प्यातील गर्डर २०२१ मध्ये टाकला. पण, बाधित होणाऱ्या म्हाडा व खासगी इमारतींमधील रहिवासी, गाळेधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला. म्हाडा त्यांचे पुनर्वसन करणार की, पालिका या वादामुळे पुलाचे काम रखडले आहे, अशी माहिती दुकानदार अजित जैन यांनी दिली.
सर एली कदुरी शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना कसरत करावी लागते. रात्री पुलावर गर्दुल्ले असतात, अशी तक्रार मालती जोशी यांनी केली.
अपघातांच्या घटना
हँकॉक पुलामुळे मेघाजी, शेख भाई, थावर मेन्शन इमारती बाधित होत आहेत. पुलाचे एका बाजूचे काम पूर्ण झाले असले, तरी अन्य मार्ग नसल्याने याच पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू आहे.
हॅमिल्टन रेसिडेन्सी परिसरातील रहिवाशांना पुलाखालील बोगद्यातून वळण घ्यावे लागत असल्याने येथे नेहमीच वाहतूककोंडी होते. पादचारी मार्ग नसल्याने वाहनांची धडक बसून अनेक नागरिक जखमी झाले आहेत.
पुलाच्या दुरुस्तीसाठी सल्लागाराची नेमणूक केली आहे. आठवड्याभरात अंदाजपत्रक तयार होईल. आमची तयारी पूर्ण झाली असली, तरी येथील काही बांधकाम व अतिक्रमणे म्हाडा आणि विभाग कार्यालयाशी संबंधित आहेत. म्हाडासह विभाग कार्यालयाला ही बांधकामे काढण्याबाबत पत्र पाठवले आहे. ही बांधकामे काढल्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येईल.
उत्तम श्रोते, मुख्य अभियंता, महापालिका