न्यूयॉर्कच्या धर्तीवर मुंबईत ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र; केसरकरांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 11:52 IST2023-10-06T11:51:40+5:302023-10-06T11:52:14+5:30
न्यूयॉर्क येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र चालवली जातात. त्याच धर्तीवर मुंबईत अशी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.

न्यूयॉर्कच्या धर्तीवर मुंबईत ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र; केसरकरांची घोषणा
मुंबई : न्यूयॉर्क येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र चालवली जातात. त्याच धर्तीवर मुंबईत अशी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. ज्येष्ठांना ने-आण करण्यासाठी स्वतंत्र बसची व्यवस्था करण्यात येईल. या केंद्रात ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आवडीनुसार दिवस घालवता येईल, असा आशावाद पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. मुंबई शहरात महिनाभरात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चर्चासत्र कार्यक्रमाचे आयोजन वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे करण्यात आले होते. यावेळी केसरकर बोलत होते.
यावेळी आमदार सदा सरवणकर, आमदार देवराव होळी, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, सहसचिव दि. रा. डिंगळे, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे उपस्थित होते.
दरम्यान, या कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ. गिरीश राजाध्यक्ष यांनी ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य व राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष निर्मला सामंत प्रभावळकर यांनी ज्येष्ठ नागरिकांचे कायदे या विषयावर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे केले तर आभार आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी मानले.
आजी-आजाेबांचा सन्मान
यावेळी ८० वर्ष वयाच्या आजी-आजोबांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण आला. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी उल्लेखनीय काम करत असलेल्या फेस्कॉम, हेल्पेज इंडिया, जनसेवा फाऊंडेशन या संस्थांचाही सत्कार करण्यात आला.