Join us
Daily Top 2Weekly Top 5

दुर्मीळ तिरंदाज पक्ष्याचे मुंबईकरांना घडले दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 10:19 IST

राज्यातील इतर जिल्ह्यांतही पक्षी निरीक्षणाची संधी.

मुंबई :मुंबई परिसरात दुर्मीळ असलेला तिरंदाज पक्षी (ओरिएंटल डार्टर), तसेच दोन्ही प्रजातींचे फ्लेमिंगो पक्षी (मोठा रोहित व छोटा रोहित), स्थलांतरित पक्ष्यांपैकी निळ्या शेपटीचा वेडा राघू, कल्लेदार सुरय (व्हिस्कर्ड टर्न), कुरव चोचीचा सुरय (गल-बिल टर्न), ठिपकेवाली तुतारी (वूड सँडपाइपर) आणि चिखली तुतारी (मार्श सँडपाइपर), सामान्य टिलवा (कॉमन रेडशांक) व भुवई बदक (गार्गनी) आदी स्थलांतरित पक्षी मुंबईकरांना पाहता आले.

निमित्त होते ते ‘महाराष्ट्र पक्षी मित्र’च्या पक्षी निरीक्षण उपक्रमाचे. तिरंदाज पक्षी धोक्यात असलेल्या प्रजातींच्या यादीत समाविष्ट आहे. मुंबई परिसरात गेल्या अनेक वर्षांत तिरंदाज पक्ष्याच्या फार कमी नोंदी आहेत.

महाराष्ट्रातील पक्षी निरीक्षण व पक्षी अभ्यासकांचे संघटन असेलेल्या ‘महाराष्ट्र पक्षी मित्र’ ही संघटना महाराष्ट्रभर पक्षी विषयक जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असते. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये व सामान्य जनतेमध्ये पक्षी निरीक्षणाची आवड निर्माण व्हावी व पक्ष्यांची माहिती व्हावी, या दृष्टीने पक्षी निरीक्षकांसाठी नि:शुल्क पक्षी निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, अशी माहिती ‘महाराष्ट्र पक्षी मित्र’चे कार्याध्यक्ष डॉ. राजू कसंबे यांनी दिली. 

या कार्यक्रमास मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद बघता पुढील काळात अशा प्रकारच्या नि:शुल्क पक्षी निरीक्षण कार्यक्रमांचे आयोजन महाराष्ट्रात इतर जिल्ह्यांत सुद्धा करण्यात येणार आहे.- डॉ. जयंत वडतकर, अध्यक्ष महाराष्ट्र पक्षी मित्र संघटना

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्र