Join us
Daily Top 2Weekly Top 5

 काय खायचे? काय नको? पालिकेतील विद्यार्थ्यांना आहार तज्ज्ञ सांगणार; शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी प्रशिक्षण  

By सीमा महांगडे | Updated: November 20, 2023 17:44 IST

महानगरपालिकेतील सुमारे ६०० विद्यार्थी व ५० शिक्षकांना या प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे.

मुंबई : शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी महानगरपालिकेच्या शिक्षण व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एसएसएसएआय) व इंडियन पेडट्रिशिअन असोसिएशन (आयपीए) यांच्या सहकार्यातून ‘संकल्प संपूर्ण स्वास्थ्य’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रम अंतर्गत ८ ते १३ वर्षे वयोगटातील मुलांना आहार तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आहार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांसाठी आहाराबाबत प्रश्नमंजुषादेखील होणार आहे.

शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांचे आरोग्यही सुदृढ राहावे यासाठी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने ‘संकल्प संपूर्ण स्वास्थ्य’ या कार्यक्रम अंतर्गत हा उपक्रम हाती घेतला आहे. गुरुवार, २३ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता भायखळा येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहातील सभागृहात या संदर्भातील शिबिराचे उदघाटन होणार आहे. राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर पुढील सहा दिवस महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षक यांना आहाराबाबतचे तज्ज्ञांद्वारे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यात २४ नोव्हेंबर रोजी महानगरपालिकेच्या ए, बी, सी, डी आणि इ विभागातील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी जगन्नाथ शंकरशेठ शाळेत, २८ नोव्हेंबर रोजी ‘जी उत्तर’ आणि ‘जी दक्षिण’ विभागातील विद्यार्थी व शिक्षकांसाठी भवानी शंकर रोड महानगरपालिका शाळेत प्रशिक्षण सत्र होईल. तसेच ३० नोव्हेंबर रोजी ‘एफ दक्षिण’ आणि ‘एफ उत्तर’ विभागातील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी एल. के. वाघजी केंब्रिज महानगरपालिका शाळेतदेखील आहारतज्ज्ञांद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे अशी माहिती महानगरपालिकेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिली आहे. ६०० विद्यार्थी ५० शिक्षकांना मिळणार प्रशिक्षणमहानगरपालिकेतील सुमारे ६०० विद्यार्थी व ५० शिक्षकांना या प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इतर सर्व शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक पालक यांना या कार्यक्रमाचा यूट्यूब लिंकद्वारे ऑनलाईन माध्यमातून प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे. महानगरपालिकेच्या ४५० शालेय इमारतींमधील ११५० शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम तसेच डिजिटल क्लासरूमच्या माध्यमातून सदर कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाचा लाभ विद्यार्थी व शिक्षकांना होणार आहे.   

टॅग्स :मुंबईशाळा