Join us  

ठाकरे युतीचा नवा पॅटर्न?; अमित शाह यांच्यासोबत राज ठाकरेंची हातमिळवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 1:49 PM

राज ठाकरे सोमवारी रात्री दिल्लीसाठी रवाना झाले होते. त्यानतंर, आज भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांची बैठक होत आहे.

नवी दिल्ली - महाराष्ट्रातील राजकारणात आणखी एकदा मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवेळी राज यांनी बुके देऊन आणि हस्तांदोलन करुन दोन्ही नेत्यांनी भेटीचा आनंद व्यक्त केला. यावेळी, राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे हेही उपस्थित होते. राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या राज्यातील राजकीय घडामोडींसह आगामी लोकसभा निवडणुकांवर चर्चा झाली असून लवकरच मनसे महायुतीत सहभागी होईल, असे दिसून येते. मात्र, राज ठाकरेंची अमित शाह यांच्यासोबत हातमिळवणी झाल्याचे फोटो समोर आले आहेत. 

राज ठाकरे सोमवारी रात्री दिल्लीसाठी रवाना झाले होते. त्यानतंर, आज भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांची बैठक होत आहे. दुपारी १२.३० वाजता राज यांनी अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुले, मनसे महायुतीतला घटक पक्ष होणार हे आता जवळपास निश्चित मानलं जात आहे. राज ठाकरेंचा मनसे पक्ष भाजपासोबत युतीत आल्याने एनडीएला महाराष्ट्रात आणखी एक मित्र सापडला आहे. मनसे भाजपा युतीत नेमक्या किती जागा लोकसभेसाठी सोडल्या जाणार अशी चर्चा आहेत. त्यात दक्षिण मुंबई आणि आणखी एक मतदारसंघ अशा २ जागा राज ठाकरेंना सोडल्या जाऊ शकतात असं बोललं जाते. 

राज ठाकरेंचा महाराष्ट्रात वेगळा प्रभाव आहे. शिवसेना आणि भाजपात गेल्या २५ वर्षांपासून युती होती. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हा युतीचा मुहूर्त साधला होता. मात्र, त्यांच्या निधनानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी फारकत घेत भाजपापासून दुरावा धरला. त्यामुळे, ठाकरेंनी भाजपाची साथ सोडली होती. मात्र, ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर आता दुसऱ्या ठाकरेंची भाजपाला साथ मिळत असल्याचं चित्र दिसून येत आहे. आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपाने राज ठाकरेंना सोबत घेऊन युतीचा नवा ठाकरे पॅटर्न सुरू केल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, राज यांनी २०१९ च्या निवडणुकीत भाजपा विरुद्ध रणशिंग फुंकले होते, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावरच जोरदार टीका केली होती. त्यावेळी, उद्धव ठाकरे हे भाजपासोबत होते. आता, एकदम उलटं चित्र दिसत असून उद्धव ठाकरे भाजपाच्या विरुद्ध आहेत. 

दरम्यान, राज ठाकरे यांनी पुत्र अमितसह गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन ते पुढे रवाना झाले आहेत. आता, ते भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतील, अशी माहिती आहे.  

टॅग्स :राज ठाकरेमुंबईअमित शाहमनसेदिल्ली