Join us

आईने दिले आठ वर्षीय मुलाला मूत्रपिंड, मूत्रपिंड दानातून समाजात निर्माण केला नवा आदर्श

By स्नेहा मोरे | Updated: November 18, 2022 11:38 IST

Mother: आईने आठवर्षीय मुलाला मूत्रपिंड दान केल्याने त्याला नवे जीवन मिळाले आहे.

- स्नेहा मोरेमुंबई : आईने आठवर्षीय मुलाला मूत्रपिंड दान केल्याने त्याला नवे जीवन मिळाले आहे. ठाण्याच्या हरीश कोनार या आठवर्षीय लहानग्याला गर्भात असताना मूत्रमार्गात अडथळा निर्माण झाला. अडथळा दूर करण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागली. या अडथळ्यामुळे मूत्रपिंड आणि मूत्राशयाला लक्षणीय क्षती पोहोचली. हरीशला सहाव्या वर्षापासून मूत्रपिंडाच्या विकाराचे निदान झाले.  त्यामुळे त्याचे प्री-एम्टीव्ह लिव्हिंगसंबंधी मूत्रपिंड प्रत्यारोपण केले. हरीशच्या आईने मूत्रपिंड दानातून समाजात नवा आदर्श निर्माण केला आहे. 

हरीशचा जन्माच्या वेळी मूत्रमार्गाच्या प्रणालीमध्ये ब्लॉक होता.  गर्भाशयातील या  समस्येमुळे कालांतराने मूत्रपिंडाचे नुकसान झाले आणि त्यामुळे क्रॉनिक मूत्रपिंड आजाराचे निदान झाले. गिरगाव येथील सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात दाखल झाल्यानंतर वैद्यकीय चाचण्यांअंती प्रत्यारोपणाची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

रुग्णालयाचे बाल नेफ्रोलॉजी व जनरल पेडियाट्रिक्सचे सल्लागार डॉ. किरण पी. साठे यांनी सांगितले की, हरीशला पोस्टरियर युरेथ्रल व्हॉल्व्ह होते. ही अशी स्थिती आहे, जेथे लघवीच्या प्रवाहात अडथळा येतो. बाळ आईच्या पोटात असताना हा अडथळा निर्माण होतो. पीयू व्हॉल्व्ह ही एक गंभीर स्थिती आहे, जी कालांतराने मुलाच्या दोन्ही मूत्रपिंडांना हानी पोहोचवू शकते. पीयू व्हॉल्व्ह असलेल्या मुलांना जन्माच्या वेळी तपशीलवार आणि त्वरित मूल्यांकन व उपचार घ्यावे लागतात. क्राॅनिक मूत्रपिंडाचा आजार ओळखण्यासाठी नियमित तपासणीची आवश्यकता असते. 

असे जपा मूत्रपिंडाचे आरोग्य रोज १० ते १२ ग्लास पाणी प्यावे.  नियमित व्यायाम करणे, वजन नियंत्रणात ठेवणे.  चाळीस वर्षांनंतर जेवणात मिठाचे प्रमाण कमी ठेवणे.  धूम्रपान, तंबाखू, गुटखा आणि मद्याचे व्यसन टाळावे.  डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अनावश्यक औषधे घेऊ नयेत.  मधुमेह, उच्च रक्तदाब असलेल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने वयाच्या २० वर्षांनंतर आरोग्य तपासणी करणे.  चाळिशीनंतर नियमितपणे आरोग्य तपासणी करणे.

टॅग्स :परिवारआरोग्य