Join us

भांडूपमध्ये अल्पवयीन मुलाने २ रिक्षांसह बसची काच फोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 06:33 IST

पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेत त्याची रवानगी बाल सुधारगृहात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भांडूपमध्ये एका १५ वर्षीय मुलाने भररस्त्यात बेस्ट बस आणि दोन रिक्षा थांबवून त्यांच्या काचा फोडल्याची खळबळजनक घटना ११ जुलैच्या रात्री घडली. धक्कादायक बाब म्हणजे, या अल्पवयीन आरोपीने भांडूप पश्चिमेकडील टँक रोडवर ४ महिन्यांपूर्वीही असेच कृत्य केले होते. पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेत त्याची रवानगी बाल सुधारगृहात केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रोळी बस डेपोत कार्यरत चालक संतोष रमेश सावंत (५२), वाहक सोमनाथ राजे (४१) यांच्यासोबत ११ जुलैला रात्री ९:२२ वाजता भांडूप स्टेशन येथून नरदासनगर येथे ६०६ क्रमांकाची बस घेऊन निघाले होते. टँक रोडवरून जात असताना ९:३० वाजता त्रिवेणी संगम बिल्डिंगसमोर एक १५ वर्षीय मुलगा हातात लोखंडी रॉड घेऊन या बससमोर आला. त्याने सुरुवातीला दोन रिक्षांच्या काचा फोडल्या. त्यानंतर बस अडवून बसच्या समोरील काचवर रॉड मारून तीही फोडली. त्यानंतर त्याने बसमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बसमधील प्रवासी घाबरून ओरडल्याने तो बसच्या बोनेटवर रॉड मारून पळून गेला.

काचा लागल्याने रिक्षा चालक जखमीरिक्षाच्या काचा लागल्याने दोन्ही रिक्षा चालक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी बेस्ट बस चालक सावंत यांच्यासह दोन रिक्षाचालकांचे जबाब नोंदवून घेत याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हे कृत्य करणाऱ्या मुलाचा शोध घेत त्याची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे.

पूर्वीची घटना एप्रिलमध्येपोलिस अभिलेखावरील या १६ वर्षीय आरोपीने १९ एप्रिलला दुपारी टँक रोडवर बस चालक ज्ञानेश्वर राठोड (४२) यांच्यावर तलवारीने हल्ला केला होता. त्यानंतर त्याने तलवारीने बसच्या समोरच्या काचा फोडल्या. त्यानंतर त्याने एका टँकरसह रिक्षांच्या काचाही तलवारीने फोडल्या. या प्रकरणी ३ गुन्ह्यांची नोंद भांडूप पोलिसांनी केली. 

टॅग्स :गुन्हेगारी