Join us
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पापूर्वी आमदार-खासदारांसोबत बैठक घ्या; भाजपाची मुंबई महापालिका आयुक्तांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 15:20 IST

म.न.पा आयुक्तांनी या विविध समितीप्रमाणे विविध खाते प्रमुख, अतिरिक्त आयुक्त आणि प्रमुख  लेखपाल सहित सर्वांना एकत्रित अंतर्भूत करून लोकप्रतिनिधी म्हणून आमदार, खासदार यांना बोलावून बैठका घ्याव्यात असं आमदार योगेश सागर म्हणाले.

मुंबई - आगामी महापालिका निवडणुकांचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले आहे. त्यात जगातील सर्वात श्रीमंत महापालिका असणाऱ्या मुंबई महापालिकेवर सध्या प्रशासक म्हणून महापालिका आयुक्त कारभार पाहत आहे. कोरोनामुळे महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्यामुळे आधीच्या नगरसेवकांची मुदत संपली आहे. दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरपासून अर्थसंकल्प बनवण्याची तयारी सुरू होते. २०२३-२४ अर्थसंकल्पासाठी पालिका आयुक्त सज्ज आहेत. त्यात आमदार-खासदारांसोबत आयुक्तांनी बैठका घ्याव्यात अशी मागणी भाजपाचे चारकोप विधानसभेचे आमदार योगेश सागर यांनी केली आहे. 

योगेश सागर यांनी पत्रात म्हटलंय की, चालू अर्थसंकल्पीय सुधारीत अंदाज २०२२-२३ आणि येणाऱ्या २०२३ -२४ चा अर्थसंकल्प तयार करण्याची कार्यवाही सुरू झाली असेल. सध्या बृहन्मुंबई महानगर पालिकेचा ५ वर्षाचा कालावधी संपला आहे व पुढील निवडणूका न झाल्यामुळे महानगरपालिका, स्थायी समिती, शिक्षण समिती, बेस्ट समिती, इत्यादी समित्या बरखास्त झाल्यामुळे सध्या आस्तित्वात नाहीत. त्याचे सर्व अधिकार प्रशासक व महानगर पालिका आयुक्ताकडे एकत्रित झाले आहेत असं त्यांनी सांगितले.  

त्यामुळे बृहन्मुंबई विभागातील विविध प्रकल्प जसे की रस्त्यांचे पुनर्पृष्टीकरण, दुरूस्ती, पदपाथ सुधारणा व सुशोभिकरण, पुल व उड्डाणपुलचे कामे, वाहतुक बेटे, उद्याने, खेळाच्या मैदानांची कामे, इत्यादी कामे लोकप्रतिनिधी विविध समित्यामार्फंत अर्थसंकल्पात समाविष्ट करतात, त्यावर विविध खाते प्रमुख, अतिरिक्त आयुक्त व मनपा आयुक्ताबरोबर विचार-परामर्श करून अर्थसंकल्पात अंतर्भूत करून मंजूरी करतात. परंतु आता सविस्तर चर्चा ह्या समिती आस्तित्वात नसल्यामुळे होणार नाही. 

म.न.पा आयुक्तांनी या विविध समितीप्रमाणे विविध खाते प्रमुख, अतिरिक्त आयुक्त आणि प्रमुख  लेखपाल सहित सर्वांना एकत्रित अंतर्भूत करून लोकप्रतिनिधी म्हणून आमदार, खासदार यांना बोलावून बैठका घ्याव्यात म्हणजे प्रकल्पाचा आढावा, पुनर्विलोकन आणि सविस्तर चर्चा आयोजित करावी. त्यामुळे आमच्यासारख्यांना अर्थसंकल्पीय कार्यवाहीत भाग घेऊन विभागातील कामाच्या सुचना देता येतील व सविस्तर चर्चा होईल. तसेच अर्थसंकल्प बनवताना स्पष्टता व पारदर्शकता येण्यासाठी या सर्व कार्यवाहीमधील अर्थसंकल्प नेहमीप्रमाणे प्रसिद्ध करावे व वेबसाईटवर उपलब्ध करावे. म.न.पा आयुक्तांनी वर सुचवल्याप्रमाणे बैठका १५ ते २० दिवसात आयोजित कराव्या अशी मागणी आमदार योगेश सागर यांनी केली आहे.   

 

टॅग्स :योगेश सागरमुंबई महानगरपालिकाभाजपा