मुंबई - डोंगरी येथील निशाणपाडा मार्गावरील ‘अन्सारी हाईट्स’ या २२ माळ्यांच्या इमारतीला बुधवारी दुपारी १च्या सुमारास भीषण आग लागली. दुर्घटनास्थळी तत्परतेने दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी बचाव कार्य हाती घेतले आणि सुमारे ४० जणांना टेरेसवर हलवून त्यांचा जीव वाचवला. या दुर्घटनेत एका महिला जवानासह पाच जखमी झाले आहेत.
प्रथम इमारतीच्या १५व्या मजल्यावरील एका सदनिकेतील स्वयंपाकघरात सिलिंडरचा स्फोट होऊन भडका उडाला. त्यानंतर आग दहाव्या, चौदाव्या आणि एकोणिसाव्या मजल्यावर पसरली. त्याचवेळी एका सदनिकेतील एसी कॉम्प्रेसरचा स्फोट झाल. यावेळी बचावकार्य करणाऱ्या एका महिला जवानावर काच कोसळून ती जखमी झाली. बाराव्या मजल्यावर एक ७२ वर्षीय ज्येष्ठ महिलाही बेशुद्ध झाली होती. अग्निशमन दलाने तिची सुटका करून रुग्णालयात दाखल केले. आग नेमकी कशामुळे लागली? इमारतीतील अग्निनियंत्रक किंवा अग्निरोधक यंत्रणा सुरू होती का? याची तपासणी अग्निशमन दल आणि मुंबई महापालिका करणार आहे.
असे झाले बचावकार्य
आग लागल्यानंतर इमारतीमध्ये हाहाकार उडाला. महिला, लहान मुले आणि वृद्धांनी भीतीने आरडाओरडा केला. चार मजल्यांवर धुराचे लोट पसरल्याने रहिवासी गुदमरण्याची शक्यता होती. दुर्घटनास्थळी त्वरित दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी मजल्यांवर अडकलेल्या रहिवाशांना सुरक्षितरीत्या टेरेसवर नेले. आगीवर नियंत्रण मिळविल्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले. एक वृद्ध आणि रुग्णाला अग्निशमन दलाच्या जवानांनी कापडाची झोळी करून सुरक्षितरीत्या बाहेर काढले.
आगीची सखोल चौकशी करा : शायना एन. सी.
आगीत मनुष्यहानी झाली नसली तरी अशा दुर्घटना घडू नयेत, म्हणून खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे या दुर्घटनेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिंदे सेनेच्या नेत्या शायना एन. सी. यांनी केली आहे. दुर्घटनास्थळी कोणतेही आश्रय क्षेत्र किंवा बाहेर पडण्यासाठी आपत्कालीन मार्ग नसल्यामुळे अडचणी आल्या, असेही त्यांनी निदर्शनास आणले.