लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सगळी वस्ती झोपतेच होती. काहीजण आपापल्या नेहमीच्या कामाला लागले होते. प्रत्येकाची काही ना काही गडबड होती. रोजच्याप्रमाणे नमाज अदा करण्याची वेळ असतानाच कुठे तरी मोठा आवाज आला. वस्तीत स्फोट झाल्याचे समजले, मात्र नेमके ठिकाण लक्षात येत नव्हते. काही क्षणात सगळी वस्ती स्फोटाच्या दिशेने धावली. प्रत्येकाचा हात मदतीसाठी पुढे झाला. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत मातीचे ढिगारे उपसण्याचे काम सुरू होते.
वांद्रे पूर्वेकडील भारतनगर परिसर अत्यंत दाटीवाटीचा असून, येथे एक, दोन व तीन मजली इमारती आहेत. ही जागा म्हाडाची असून, तेथे १९७९-८० च्या काळात लोकांना बैठी घरे बांधण्याची परवानगी होती. नंतरच्या काळात वस्ती वाढत गेली तशी मजल्यावर मजले चढत गेले. याच दाटीवाटीने वसलेल्या लोकवस्तीत शुक्रवारी सकाळी पावणेसहाच्या सुमारास गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे स्फोट झाला. घटनास्थळी अग्निशमन दलाचे मदत कार्य सुरू असतानाच स्थानिकांकडून परिसर रिकामा करून देण्यात आला.
भाभा आणि केईएम रुग्णालयात रुग्णांना दाखल करण्यात आले असून, उपचारानंतरही त्यांना मदतीची गरज आहे. कारण त्यांची कोसळलेली घरे आता लगेच उभी राहणार नाहीत. यासाठी प्रशासनाने त्यांची लगतच्या महापालिका शाळेत किंवा उर्वरित ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते मोहम्मद जावेद शेख यांनी प्रशासनाकडे केली.