समुद्रात टाकला भरभरून कचरा अन् व्हिडीओ झाला व्हायरल; पालिकेने ठोठावला १० हजारांचा दंड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 16:08 IST2023-11-22T16:04:09+5:302023-11-22T16:08:07+5:30
बेजबाबदार नागरिक गल्ली - बोळात बिनदिक्कतपणे कचरा टाकताना दिसतात.

समुद्रात टाकला भरभरून कचरा अन् व्हिडीओ झाला व्हायरल; पालिकेने ठोठावला १० हजारांचा दंड!
मुंबई :
बेजबाबदार नागरिक गल्ली - बोळात बिनदिक्कतपणे कचरा टाकताना दिसतात. पण, थेट ताज महल हॉटेलच्या समोर गेट वे ऑफ इंडियाच्या समुद्रात भरभरून कचरा टाकतानाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
कचरा टाकतानाचे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पालिकेने संबंधितांचा शोध घेतला आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच टॅक्सी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेट वे ऑफ इंडिया हे देशी - विदेशी पर्यटकांसाठी महत्त्वाचे पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणी दररोज हजारो पर्यटक येतात. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत होती.
पर्यटनस्थळाच्या ठिकाणी समुद्रात कचरा टाकत असलेले छायाचित्र हे चित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हिडीओची दखल घेत महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांनी कचरा टाकणाऱ्याचा शोध सुरू केला.
कचरा घेऊन आलेल्या टॅक्सीचा नंबरच्या आधारे त्या व्यक्तिला शोधण्यात आले. त्यानंतर ‘ए’ विभागाच्या घनकचरा व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी त्याला १० हजारांचा दंड ठोठावला. कचरा टाकणाऱ्या व्यक्तीचे नाव हाजी अब्दुल रेहमान शाह काद्री असून, तो जे. जे. रुग्णालय परिसरात राहणारा आहे.