Lamborghini Car on Fire : तुम्ही आतापर्यंत अनेकदा धावत्या कारमध्ये आग लागल्याच्या घटना पाहिल्या असतील. अनेकदा कमी सुरक्षा फिचर्स असलेल्या गाड्यांबाबत अशाप्रकारच्या घटना घडतात. पण, मुंबईतील कोस्टल रोडवर चक्क लॅम्बोर्गिनी कारला आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये कार जळताना दिसतेय. हा व्हिडिओ सुप्रसिद्ध उद्योगपती गौतम सिंघानिया यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.
या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रशासनाने या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, बुधवारी रात्री 10.20 च्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. अग्निशमन दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी पाठवण्यात आले. त्यानंतर 45 मिनिटांत लॅम्बोर्गिनी कारमधील आग आटोक्यात आणण्यात आली.
गौतम सिंघानिया काय म्हणाले?या घटनेचा व्हिडिओ बिझनेस टायकून आणि द रेमंड समूहाचे प्रमुख गौतम सिंघानिया यांनी शूट केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी मुंबई पोलिसांना टॅग केले. व्हिडिओमध्ये गुजरात नोंदणी असलेली लॅबोर्गिनी कार जळताना दिसते. गौतम सिंघानिया यांनी व्हिडिओ शेअर करत लॅम्बोर्गिनीच्या विश्वासार्हता आणि सुरक्षा मानकांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.