९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 08:01 IST2025-10-07T08:00:36+5:302025-10-07T08:01:08+5:30
पुढील दहा वर्षांत प्रत्येक तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी पर्यटन क्षेत्रातून येणार; जगभरात ४.३ कोटी कर्मचाऱ्यांची कमतरता; भारतात सुमारे १.१ कोटी कामगारांची तूट येणार; कौशल्य शिकून संधी साधा

९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आंतरराष्ट्रीय प्रवास आणि पर्यटन क्षेत्र पुढील दहा वर्षांत तब्बल ९.१ कोटी नवीन रोजगार निर्माण करणार आहे. म्हणजेच जगभरात निर्माण होणाऱ्या प्रत्येक तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी पर्यटन क्षेत्रात असेल. भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेला पर्यटन क्षेत्र मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देत असले तरी, पुढील दहा वर्षांत या क्षेत्रात भारतात सुमारे १.१ कोटी कामगारांची तूट निर्माण होणार आहे, असा अंदाज वर्ल्ड ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम कौन्सिलच्या अहवालात वर्तवण्यात आला आहे.
या अहवालानुसार, सध्याच्या बदलांकडे दुर्लक्ष झाल्यास ४.३ कोटी कर्मचाऱ्यांची कमतरता निर्माण होऊ शकते. या क्षेत्राने २ कोटी ७ लाख नवीन नोकऱ्या दिल्या आहेत.
युरोप पर्यटनात आघाडीवर
युरोप पर्यटनात आघाडीवर राहिला असून, जगातील सर्वाधिक प्रभावी १० पर्यटन बाजारांपैकी ५ बाजार युरोपमध्ये आहेत.
मध्य पूर्वेतील देशांपैकी सौदी अरेबिया वेगाने वाढणारा देश ठरत असून, तेथे पायाभूत सुविधांवरील गुंतवणूक विक्रमी पातळीवर आहे.
भारतासमोरील आव्हाने?
कौशल्यअभाव : प्रशिक्षण आणि कौशल्यविकास कार्यक्रमांची मर्यादित उपलब्धता.
तरुणांचा कमी सहभाग : कामाचे जास्त तास, शिफ्ट पद्धती आणि कमी वेतन यामुळे अनेकजण या क्षेत्रातून बाहेर पडत आहेत.
डिजिटल कौशल्यांची गरज : तंत्रज्ञान आणि एआयचा वापर वाढल्यामुळे नवीन कौशल्यांची मागणी वाढेल.
अहवालातील शिफारशी?
सरकारने तरुणांना पर्यटन क्षेत्राकडे आकर्षित करावे.
महाविद्यालयांमध्ये पर्यटन अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण वाढवा.
सरकार-खासगी क्षेत्र भागीदारी वाढवा.
कर्मचाऱ्यांना कौशल्यांत प्रशिक्षित करा.
लवचीक रोजगार आणि कामकाजाचे कमी तास उपलब्ध करून द्या.