लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिंदेसेनेला पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे यांच्या राजकीय भूमिकेवर विविध स्तरांतून टीका होत असतानाच, शुक्रवारी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त
समाज माध्यमावर भावनिक आणि त्यांची भूमिका मांडणारी पोस्ट शेअर केली. आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली, तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल, असा मी शब्द देत असल्याचे राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
इतिहासात अनेकांच्या जन्मशताब्दी साजऱ्या झाल्या असल्या, तरी हयात नसतानाही एखादी व्यक्ती लोकांच्या स्मृतीत जिवंत राहते आणि प्रांताच्या राजकारणाला आजही दिशा देते, हे दुर्मीळ आहे. हे फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबतीतच शक्य आहे, असे त्यांनी म्हटले आहे. बाळासाहेब द्विशतकी जन्मवर्षातही स्मरणात राहतील, मात्र तोपर्यंत मराठी माणूस दुभंगलेला, खचलेला किंवा अन्याय सहन करणारा नसावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आजच्या राजकारणावर टीका करताना राज ठाकरे म्हणाले की, सध्या निष्ठा विकल्या जातात, तत्त्व फेकून दिली जातात आणि राजकारण पूर्णतः व्यवहारप्रधान झाले आहे. निवडणुकीतील यश हे मुद्दे किंवा अस्मिता जपण्यापेक्षा वापरलेल्या क्लृप्त्यांवर मोजले जाते. बाळासाहेबांच्या काळात मात्र सत्तेपेक्षा कार्यकर्त्याला सन्मान आणि जबाबदारी देण्याला अधिक महत्त्व होते, असे त्यांनी नमूद केले. बाळासाहेबांचा दूरदृष्टीकोन आजही सुसंगत असून, तो भविष्यातही राहील, असे सांगत राज ठाकरे यांनी त्यांना ‘कालातीत नेता’ असे संबोधले आहे.
‘बाळासाहेब’, ‘मराठी’वरील श्रद्धा कमी होणार नाही
महत्त्वाचे म्हणजे, सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, बाळासाहेबांनाही राजकारणात कधीतरी लवचिक भूमिका घ्यावी लागली, म्हणून त्यांचे मराठी माणसावरचे प्रेम तसूभरही कमी झाले नाही, उलट ते अधिकच दृढ होत गेले. हेच संस्कार आमच्यावर आहेत. आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी लवचिक भूमिका घ्यावी लागली, तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थसाठी कधीही नसेल. बाळासाहेब आणि ‘मराठी’ या दोन शब्दांवरील आपली आणि महाराष्ट्र सैनिकांची श्रद्धा कधीही कमी होणार नाही, असे ठाम आश्वासन देत त्यांनी पोस्टचा शेवट केला.
लढा धगधगत राहील
बाळासाहेबांसारखी प्रतिभा किंवा त्यांच्यासारखे राजकारण पुन्हा होणार नाही, मात्र मराठी भाषा, प्रांत आणि माणसासाठी त्यांनी उभारलेला लढा कायम धगधगत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Web Summary : Raj Thackeray assures that any flexible political stance is for Marathi people, not personal gain. He emphasizes unwavering faith in Balasaheb Thackeray's ideals and commitment to Maharashtra.
Web Summary : राज ठाकरे ने आश्वासन दिया कि कोई भी लचीला राजनीतिक रुख मराठी लोगों के लिए है, न कि व्यक्तिगत लाभ के लिए। उन्होंने बालासाहेब ठाकरे के आदर्शों और महाराष्ट्र के प्रति प्रतिबद्धता पर अटूट विश्वास पर जोर दिया।