Join us  

उद्धव ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला एकनाथ शिंदेंचं खतपाणी; बैठकीत घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 5:24 PM

आज शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली.

मुंबई- आज शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्येच राज्यात वाढत्या वीज दरावर सामान्य माणसाला दिलासा देत वीज दर प्रति युनिट एक रुपयांनी स्वस्त करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच लोणार सरोवर संवर्धनासाठी ३७० कोटी रूपये निधी मंजूर करण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला. 

 शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान, प्रति युनिट १ रुपये वीज सवलत; एकनाथ शिंदेंच्या मोठ्या घोषणा

गेल्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोणार सरोवराला भेट देत येथील विकास व संवर्धनासाठी २०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. उद्धव ठाकरेंचा लोणार विकास हा ड्रीम प्रोजेक्ट मानला जात असताना एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या आजच्या निर्णयाची चर्चा सध्या रंगू लागली आहे. एकनाथ शिंदे यांनी लोणार संवर्धनासाठी उद्धव ठाकरेंपेक्षा १७० कोटी जास्त देत ३७० कोटी रुपये देण्याची घोषणा  केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकल्पाला एकनाथ शिंदेंनी मोठं खतपाणी दिल्याची चर्चा रंगू लागली आहे.

लाखो वर्षांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराची निर्मिती उल्कापातामुळे झाली. सुमारे २० लाख टन वजनाची उल्का जोरदार वेगाने पृथ्वीवर आदळली. त्यामुळे पृथ्वीवर १.८ व्यासाचा आणि २०० मीटर खोलीचा खड्डा तयार झाला. हेच ते लोणार सरोवर. लोणार सरोवर हे बेसॉल्ट खडकातील एकमेव आघाती विवर आहे. हे सुंदर आणि खाऱ्या पाण्याचं अनोखं सरोवर पाहण्यासाठी देशासह परदेशातूनही पर्यटक येतात.

लोणार सरोवर हे जागतिक किर्तीचं पर्यटन केंद्र असल्याने जगभरातून लोणार सरोवराला भेट देण्यासाठी विदेशी पर्यटक येत असतात. लोणार सरोवराभोवती मोठं जंगल आहे आणि या जंगलात रहिवाशांनी अतिक्रमण करुन अधिवास थाटला आहे आणि त्यामुळे या जंगलातील वन्यजीव हे धोक्यात आले आहेत. लोणारच्या भोवताली जंगलात विविध जातीचे पक्षी, दुर्मिळ पक्षी, प्राणी आहेत आणि त्यांचं संरक्षण होणं गरजेचं आहे.

टॅग्स :एकनाथ शिंदेउद्धव ठाकरेशिवसेनालोणार सरोवर