मुंबई - ही कहाणी आहे एका ४ महिन्याच्या चिमुरडीची..या बाळाला जन्माला आल्यापासून आतापर्यंत केवळ तिरस्कारच वाट्याला आला. हिला जन्म देणाऱ्या आईने गर्भपात करायचं ठरवलं होतं. पती नशेत धुंद असतो म्हणून तिला हे मुल नको होतं. मात्र त्याचवेळी तिला दुसरी महिला भेटते, जिने या महिलेला गर्भपात करण्यापासून रोखत या बाळाची आई ती होईल असं आश्वस्त करते. अखेर ९ महिने गर्भात वाढवल्यानंतर ती मुलीला जन्म देते. त्यानंतर दुसरी महिला या मुलीला दत्तक घेते. मात्र ४ महिन्यांनी असं काही घडते ज्यामुळे या चिमुरडीला बालगृहात पाठवण्याची वेळ येते.
माहिरा नावाची ही बालिका जन्मापासून सतत आजारी पडू लागली. त्यामुळे तिला परेलच्या वाडिया रुग्णालयात दाखल केले. ४ महिन्याच्या या मुलीवर अपेंडिक्सची शस्त्रक्रिया झाली. त्यावेळी केलेल्या चाचणीत ती एचआयव्ही बाधित असल्याचं उघड झालं. त्यामुळे आईवरही एचआयव्हीचे उपचार करायचे म्हणून तिची आई असल्याचा दावा करणाऱ्या मुस्लीम महिलेला डॉक्टरांनी बोलावले. मात्र आजारी माहिराला जन्म देणारी ती नसून एक हिंदू महिला आहे असं समोर येते. त्यामुळे हे बाळ बेकायदा दत्तक दिल्याचं बिंग फुटते. या प्रकरणी दोन्ही महिलांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. माहिराच्या जन्मदात्रीचा शोध पोलीस घेत आहेत. त्यात ४ महिन्याच्या माहिराला पोलिसांनी बालगृहात ठेवले आहे.
हिंदू महिलेने KEM रुग्णालयात माहिराला जन्म दिला होता. मुस्लीम महिला माहिराला दत्तक घेऊ इच्छित होती त्यामुळे जन्मावेळी मुस्लीम महिलेच्या आधारकार्डचा वापर हिंदू महिलेने केला. मुस्लीम महिलेने हिंदू महिलेला गर्भपात करण्यापासून रोखलं होते. याआधी मुस्लीम महिलेचा २ वेळा गर्भपात झाला होता. त्यामुळे तिला बाळाची गरज होती. ऑक्टोबर २०२४ मध्ये केईम रुग्णालयात माहिराचा जन्म झाला मात्र ती सातत्याने आजारी पडत होती. जानेवारीत माहिराला वाडिया रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले तेव्हा ती HIV पॉझिटिव्ह असल्याचं समोर येताच मुस्लीम महिलेनेही चिमुरडीला नाकारले.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आडवली ढोकाळी येथील बेकायदा मुलगी दत्तक देण्याची घटना ठाणे जिल्हा महिला आणि बालहक्क विभागाने दोन्ही महिलांवर गुन्हा दाखल केला. वाडिया रूग्णालयाने महिला बालविकास कार्यालयाला माहिती दिली. त्यानंतर चौकशीची चक्रे फिरून बालकांची काळजी आणि संरक्षण अधिनियम २०१५ च्या कलमान्वये दोन्ही महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना उघड होताच माहिराची जन्मदात्री आई भाड्याचे घर सोडून पळून गेली. पोलीस या महिलेचा शोध घेत आहेत.