मुंबईकरांसाठी मोठे गिफ्ट; महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्य दिव्य सेंट्रल पार्क!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 09:32 IST2025-12-16T09:31:39+5:302025-12-16T09:32:13+5:30
सेंट्रल पार्क मुंबईकरांसाठी मोठे गिफ्ट असून, रेसकोर्स व त्याच्या ऐतिहासिक वारशाला कुठेही धक्का लागणार नाही.

मुंबईकरांसाठी मोठे गिफ्ट; महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्य दिव्य सेंट्रल पार्क!
मुंबई : मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स आणि कोस्टल रोडची मोकळी जागा मिळून एकूण २९५ एकरवर जागतिक दर्जाचे सेंट्रल पार्क उभारण्यात येणार आहे. त्याचा आराखडा सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सादर करण्यात आला. यावेळी पालिका आयुक्त भूषण गगराणी, आर्किटेक्ट हाफीज कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते.
सेंट्रल पार्क मुंबईकरांसाठी मोठे गिफ्ट असून, रेसकोर्स व त्याच्या ऐतिहासिक वारशाला कुठेही धक्का लागणार नाही. प्रकल्पामुळे २९५ एकरचे ऑक्सिजन पार्क तयार होणार असल्याने वायू प्रदूषण कमी होईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली. सेंट्रल पार्कखाली १० लाख चौरस फुटांचे जागतिक दर्जाचे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सही विकसित केले जाईल, यात आंतरराष्ट्रीय खेळांसह, खो-खो, कबड्डी अशा खेळांसाठीही सुविधा असतील. सेंट्रल पार्कमध्ये फिरताना अश्वशर्यतीही पाहता येतील.
सेंट्रल पार्क पूर्णपणे उद्यान असेल
सेंट्रल पार्क पूर्णपणे उद्यान असेल, येथे पदपथ वगळता कोणतेही बांधकाम नसेल. वाहतूक नियोजनासाठी सेंट्रल पार्क १२०० मीटर भूमिगत मार्गान कोस्टल रोडशी जोडण्यात येईल. यासाठी ५५० कोटींचे टेंडर काढले आहे. नेहरू विज्ञान केंद्र हे मेट्रो स्टेशन भूमिगत मार्गाने सेंट्रल पार्कशी जोडले जाईल, हा भूमिगत मार्ग अॅनी बेझंट मार्गाने पुढे हाजीअलीपर्यंत जाऊन पार्किंगला जोडला जाईल, अशी माहिती गगराणी यांनी दिली.
ठाण्यात सगळ्यात उंच व्हिविंग टॉवर
ठाणे खाडी किनारी ५० एकरात भारतातील सर्वात उंच १६० मीटर उंचीचा व्हिविंग टॉवर उभारला जाईल. फ्रान्सचा आयफेल टॉवर ३०० मीटर उंच आहे. कासारवडवलीत कन्व्हेन्शन सेंटर तर कोलशेत येथे २५ एकरात टाऊन पार्क, आगरी कोळी संग्रहालय, मत्स्यालय, विज्ञान केंद्र, आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्नो पार्क, अॅम्युझमेंट पार्क, अॅडव्हेंचर पार्क, १२.५ एकरात पक्षी संग्रहालय, म्युझिकल कॉन्सर्ट सेंटर व अत्याधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारले जाईल.
२. तसेच मीरा-भाईंदर पालिकेच्या सीमेलगत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला जोडून १८.४ किमी लांबीचा आनंदवन हरित पट्टा विकसित केला जाईल, यामुळे ठाणे जिल्ह्यातील प्रतिभावान खेळाडूंना अत्याधुनिक सेवा-सुविधा उपलब्ध होतील, असे शिंदे यांनी सांगितले.
पार्कची वैशिष्ट्ये
- १२ एकर जागेवर सिटी फॉरेस्ट विकसित केले जाईल.
- ७७ एकरवर गार्डन व ओपन कॉन्सर्टसाठी मैदान.
- ३१ एकरवर बॉटनिकल गार्डन, इनडोअर कॉन्सर्ट अरेना आणि कॉन्व्हेंशन सेंटर.
- हिरवेगार बॉटनिकल लैंडस्केप व वर्ल्ड क्लास इनडोअर अरेना.
- वर्ल्ड क्लास मल्टी स्पोर्ट अरेना, आंतरराष्ट्रीय दर्जाची बॉक्सिंग रिंग, खो-खो, स्केटिंग, जिमॅस्टिक, बास्केटबॉल यांसाठी क्रीडा मैदाने.