Mumbai Accident: जोगेश्वरी पूर्व येथील नटवर नगर परिसरात सोमवारी दुपारी पाण्याच्या टँकरने धडक दिल्याने एका ६३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. श्राद्ध विधीसाठी नातेवाईकांकडे आलेल्या ६३ वर्षीय आशा जाधव यांना पाण्याच्या टँकरन धडक दिली. टँकर चालक मोबाईलवर बोलत असल्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अपघात घडल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी केला. जोगेश्वरी पोलिसांनी संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार आदित्य जाधव (वय १९) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या चुलत काकी आशा या दिवंगत काका अजय यांच्या श्राद्धसाठी मुंबईत आल्या होत्या. विधी संपल्यानंतर आदित्य त्यांना घरी सोडण्यासाठी अॅक्टिव्हा स्कूटरवर घेऊन निघाले होते. दुपारी १२.४५ च्या सुमारास ते जे स्कूल गेटसमोरून जात असताना, मागून भरधाव आलेल्या पाण्याच्या टँकरने त्यांच्या स्कूटरला डाव्या बाजूने जोरदार धडक दिली. त्यानंतर आशा स्कूटरवरून खाली पडल्या. टँकरच्या पुढच्या टायरखाली त्यांचा हात चिरडला आणि त्या जखमी झाल्या.
आदित्यने तातडीने मागे वळून पाहिले असता, टँकर चालक अंगदकुमार यादव (३२) मोबाईलवर बोलत असल्याचे त्याला दिसले. फोनवर बोलताना टँकरचे नियंत्रण सुटले आणि रहदारीकडे त्याचे लक्ष नसल्यामुळेच अपघात झाला, अशी तक्रार आदित्यने दिली.
अपघातानंतर आशा जाधव यांना तातडीने उपचारासाठी जोगेश्वरी येथील ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आणि त्यांना मृत घोषित केले. आजूबाजूच्या लोकांनी टँकर चालक अंगदकुमारला पकडून पोलिसांकडे सोपवलं. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या संबंधित कलमांतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.