जेथे विमान पडले हाेते त्या घाटकोपरमधील जागेवर उभी आहे १२ मजली भव्य इमारत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 06:58 IST2025-06-13T06:58:01+5:302025-06-13T06:58:34+5:30
Plane Crash: २०१८ मध्ये घाटकोपर येथे चाचणी उड्डाणादरम्यान विमान कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला होता. पृथ्वी लाइफ स्पेक्सच्या इमारतीचे बांधकाम सुरू असताना २८ जून २०१८ रोजी ही दुर्घटना घडली होती. त्या दुर्घटनास्थळी आता १२ मजली निवासी इमारत उभी राहिली आहे.

जेथे विमान पडले हाेते त्या घाटकोपरमधील जागेवर उभी आहे १२ मजली भव्य इमारत
- खलील गिरकर
मुंबई - २०१८ मध्ये घाटकोपर येथे चाचणी उड्डाणादरम्यान विमान कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला होता. पृथ्वी लाइफ स्पेक्सच्या इमारतीचे बांधकाम सुरू असताना २८ जून २०१८ रोजी ही दुर्घटना घडली होती. त्या दुर्घटनास्थळी आता १२ मजली निवासी इमारत उभी राहिली आहे.
अपघात घडला तेव्हा तेथील कामगार जेवणासाठी बाजूला गेले होते. त्यामुळे मोठी जीवित हानी टळली होती. ज्या ठिकाणी विमान कोसळले होते, तेथे २०२२ पासून रहिवासी वास्तव्य करत आहेत. आता येथील इमारतींवरून दर मिनिटाला विमानांची ये-जा सुरू असते. त्यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारची भीती वाटत नाही, असे मत या ठिकाणी काम करणारे कर्मचारी तुषार भोर व चेतना जैन यांनी व्यक्त केले. विमान दुर्घटनेचा घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर काहीही परिणाम झाला नाही, अशी माहितीही त्यांनी दिली. मृत्यू कधीही येतो, त्यामुळे भीतीच्या छायेत राहून काही फायदा होणार नाही, असे मत येथील सुरक्षारक्षकाने व्यक्त केले.
कधी व कसा घडला होता अपघात?
घाटकोपरमध्ये जीवदया लेन परिसरातील निर्माणाधीन इमारतीच्या साइटवर झालेला अपघात तांत्रिक बिघाड आणि खराब हवामान यामुळे झाल्याचा निष्कर्ष २०२० मधील अहवालात समोर आला. लहान आकाराच्या या सी-९० चार्टर विमानाने जुहू येथून टेस्ट फ्लाइटसाठी उड्डाण केले होते.
दुर्घटनेतील मृतांमध्ये एक पायलट, एक सहायक पायलट व दोन इंजिनिअर तसेच रस्त्यावर चालणारा एका पादचाऱ्याचाही समावेश होता. लँडिंगच्या काही मिनिट आधी हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते. यात विमानातील जळते इंधन अंगावर पडून पादचाऱ्याचा मृत्यू झाला होता. विमानाच्या दुरुस्तीवर तीन वर्षात आठ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.