मुंबईतील ९६ इमारती अतिधोकादायक म्हणून जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 14:12 IST2025-05-22T14:11:13+5:302025-05-22T14:12:26+5:30
मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे मुंबईतील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण ...

मुंबईतील ९६ इमारती अतिधोकादायक म्हणून जाहीर
मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे मुंबईतील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण केले असून, यावर्षी ९६ इमारती अतिधोकादायक म्हणून जाहीर केल्या आहेत. यात मागील वर्षी अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या दोन इमारतींचाही समावेश आहे. यावर्षीच्या यादीत गिरगावमध्ये १४, खेतवाडीत ४, दादरमध्ये ७ इमारती असून,परळ, माझगाव, ना.म.जोशी मार्ग व काळबादेवीतही अधिक इमारतींची नोंद झाली आहे.
पावसाळ्यात खबरदारीचा उपाय म्हणून म्हाडाकडून मुंबईत सर्वेक्षण करून धोकादायक व अतिधोकादायक इमारतींची यादी घोषित करण्यात येते. यंदा अतिधोकादायक ठरलेल्या ९६ इमारतींमध्ये २५७७ निवासी आणि ५८५ अनिवासी रहिवाशांची नोंद झाली आहे. यातील १८४ निवासी लोकांना घरे खाली करण्याकरिता नोटीस देण्यात आली आहे. नोटीस बजावलेल्या रहिवाशांपैकी ३ भाडेकरू संक्रमण शिबिरामध्ये स्थलांतरित झाले आहेत. नोटीस देऊनही घरे खाली न केलेल्या निवासी गाळ्यांची संख्या १७६ आहे.
संक्रमण शिबिरात व्यवस्था
म्हाडातर्फे करण्यात आलेल्या कार्यवाहीनुसार एकाही रहिवाशाने स्वतःची निवाऱ्याची पर्यायी व्यवस्था केलेली नाही. उर्वरित इमारतींमधील रहिवाशांना इमारत पाडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सध्या घरे खाली करून घेण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच २५७७ रहिवाशांची संक्रमण शिबिरात व्यवस्था करावी लागणार आहे. म्हाडातर्फे याबाबत कार्यवाही सुरू आहे.