आरटीओच्या टोल क्रमांकावर ९५ तक्रारींची नोंद; जादा भाडे आकारणीच्या सर्वाधिक तक्रारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 07:38 IST2025-07-14T07:38:17+5:302025-07-14T07:38:40+5:30
सार्वजनिक तसेच खासगी प्रवासी वाहनांबाबतच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत.

आरटीओच्या टोल क्रमांकावर ९५ तक्रारींची नोंद; जादा भाडे आकारणीच्या सर्वाधिक तक्रारी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील ऑटो रिक्षा, टॅक्सी व ॲप आधारित सेवांबाबत तक्रारीसाठी परिवहन विभागाकडून (आरटीओ) टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे. त्याचे केंद्र अंधेरी आरटीओ कार्यालयात स्थापित करण्यात आले असून, १० जुलैपर्यंत त्यावर ९५ तक्रारी प्राप्त झाल्या असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यामध्ये सर्वाधिक तक्रारी जादा भाडे आकारणीसंदर्भात असल्याची माहिती समोर आली आहे.
सार्वजनिक तसेच खासगी प्रवासी वाहनांबाबतच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. बेशिस्त चालकांविरुद्ध प्रवाशांना भाडे नाकारणे, अतिरिक्त भाडे आकारणे, गैरवर्तन अशा प्रकारच्या तक्रारी नोंदविण्यासाठी आरटीओने संपूर्ण एमएमआरसाठी एकच क्रमांक जारी केला आहे.
अंधेरीत विशेष कक्ष
तक्रार निवारणासाठी व चालकांविरुद्ध कारवाई करता यावी, यासाठी अंधेरी आरटीओ कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यासाठी मुंबई, ठाण्यासह सर्व आरटीओ कार्यालयांत दोन सहायक मोटर वाहन निरीक्षकांना नियुक्त करण्यात आले आहे. या माध्यमातून तक्रार प्राप्त झाल्यावर त्याची शहानिशा करून संबंधित चालकाविरोधात कारवाई करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अशी केली जाते कारवाई
वाहनचालकाच्या समुपदेशनाद्वारे तक्रार तोंडी सोडविणे. लेखी नोटीस पाठवून त्याचे म्हणणे मांडण्याची संधी देणे, दंडात्मक कारवाई करणे. ब्लॅकलिस्टमध्ये नमूद वाहनांचे कारवाईपर्यंत कोणतेही कामकाज न करणे.
जादा भाडे आकारणे ३१
भाडे नाकारणे २८
प्रवाशांसोबत युद्धात वर्तन १७
नो पार्किंग १३
ओव्हर स्पीड ४
जादा प्रवासी वाहतूक १
सदोष मीटर १
एकूण ९५