Join us
Daily Top 2Weekly Top 5

९० कोटी मुंबईकरांचा मेट्रो १ मधून प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 10:23 IST

आतापर्यंत ९० कोटींपेक्षा जास्त प्रवाशांनी मेट्रो १ मधून प्रवास केला आहे.

मुंबई :  पहिलीवहिली मेट्रो रेल्वे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घाटकोपर ते वर्सोवा या मेट्रो १ मार्गिकेला ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. दिवसेंदिवस या मेट्रो मार्गिकेला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ९० कोटींपेक्षा जास्त प्रवाशांनी मेट्रो १ मधून प्रवास केला आहे. येत्या काळात प्रवाशांचा हा आकडा वाढेल, असा विश्वास मेट्रो प्रशासनाने व्यक्त केला आहे.

८ जून २०१४ रोजी मुंबईत पहिली मेट्रो धावली. घाटकोपर ते वर्सोवा हा ११.४० किमी लांबीचा पहिला मेट्रो मार्ग असून पूर्व आणि पश्चिम उपनगराला ही मेट्रो जोडते. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडून घाटकोपर ते वर्सोवा ही मेट्रो चालवली जात असून मेट्रोतून सरासरी ४.८ लाख प्रवासी प्रवास करत आहेत.

२५ मिनिटांचा प्रवास :

मुंबई मेट्रो १ या मार्गिकेमुळे प्रवाशांचा बराच वेळ वाचत आहे. घाटकोपरहून वर्सोवाला वाहनाने जाताना ७१ मिनिटे लागतात मात्र या मेट्रो मार्गिकेमुळे या वेळेत प्रचंड बचत झाली असून ७१ मिनिटांचा प्रवास २१ ते २५ मिनिटांवर आला आहे. या प्रवासामुळे चारचाकी दुचाकी वाहनाला लागणारे इंधनाची बचत होत आहे तसेच पर्यावरणाचे संवर्धनदेखील होत आहे.

३.५ मिनिटाने एक मेट्रो:

प्रवाशांचा हळूहळू वाढता प्रतिसाद पाहता प्रशासनाने या मार्गावर फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला.पीक अवरला ३.५ मिनिटाने एक मेट्रो धावते तर नॉन पीक अवरला ८ मिनिटाने एक मेट्रो धावते.

सुखकर प्रवास :

 मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा, त्यांच्या वेळेत बचत व्हावी व दर्जेदार सेवा उपलब्ध करून द्यावी यासाठी मेट्रो प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

 त्याच बरोबर प्रवाशांचा प्रवास स्वच्छ, सुरक्षित आणि आरामदायी व्हावा यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जातील असे मेट्रो वनचे म्हणणे आहे.

टॅग्स :मुंबईमेट्रो