Join us

खड्ड्यांच्या दाखल तक्रारींपैकी ९०% तक्रारींचे २४ तासांत निराकरण; पालिकेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 03:53 IST

८० हून अधिक नागरिकांना अदा केले ५०० रुपये

मुंबई : मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या ‘खड्डे दाखवा, पाचशे रुपये मिळवा’ या योजनेला मुंबईकरांनी भरभरून प्रतिसाद देत, आपआपल्या परिसरातील खड्ड्यांच्या तक्रारी अ‍ॅपवर अपलोड केल्या. महापालिकेनेदेखील त्वरित कारवाई करत खड्ड्यांच्या दाखल तक्रारींपैकी ९० टक्क्यांहून अधिक तक्रारी २४ तासांत सोडविल्याचा दावा केला आहे. याहून महत्त्वाचे म्हणजे, या योजनेला भरभरून प्रतिसाद दिल्याने मुंबईकरांचे आभार मानत दाखल तक्रारींपैकी जे खड्डे २४ तासांत भरण्यात आले नाहीत, त्या खड्ड्यांंबाबत ८० हून अधिक नागरिकांना प्रत्येकी ५०० रुपये अदा करण्यात आले आहेत, असेही मुंबई महापालिकेने म्हणत ही योजना सुरूच राहणार असल्याचे टिष्ट्वट केले आहे.पावसाळ्याचे चार महिने संपून आॅक्टोबर महिना उलटला, तरी मुंबई खड्ड्यात होती. परिणामी, १ नोव्हेंबरपासून मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी महापालिकेने नामी शक्कल लढविली. ‘खड्डे दाखवा, पाचशे रुपये मिळवा’ अशी योजनाच महापालिकेने हाती घेतली. तत्पूर्वी आॅक्टोबर महिन्यात भांडुप येथे रस्ते विभागाची यासंबंधी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत रस्त्यांवरील खड्डे ३१ आॅक्टोबरपर्यंत बुजविण्यात यावेत, असे निर्देश देण्यात आले. १ नोव्हेंबरपासून मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे दिसणार नाहीत, असा दावा पालिकेने केला आणि खड्डे दिसलेच, तर मात्र ‘खड्डे दाखवा, पाचशे रुपये मिळवा’ ही योजना सुरू केली. योजना सुरू होताच महापालिकेकडे खड्ड्यांसाठी तक्रारी दाखल होऊ लागल्या. ‘खड्डे दाखवा, पाचशे रुपये मिळवा’ या अभिनव योजनेला मुंबईकरांनी तुफान प्रतिसाद दिला. महापालिकेनेदेखील २४ तासांत संबंधित खड्डे बुजविण्यावर भर दिला. परिणामी, यापूर्वी ९१.३ टक्के एवढे खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा महापालिकेने केला आणि नागरिकांनीही अभिनव उपक्रम राबविल्याने महापालिकेला ‘फाइव्ह स्टार’ रेटिंग दिले. अशी योजना आमच्याकडेही राबविण्यात यावी; अशा आशयाचे म्हणणे बंगळुरू, हैदराबाद आणि ठाणेकरांनी मांडले.६९ टक्के मुंबईकरांनी दिले ‘फाइव्ह स्टार’ रेटिंगखड्डे बुजविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्यानंतर मुंबईकरांकडून अभिप्राय मागविण्यात आले. त्यानुसार, ६९ टक्के मुंबईकरांनी खड्डे बुजविण्यासंदर्भातील कारवाईला ‘फाइव्ह स्टार’ रेटिंग दिले, तर ४ टक्के मुंबईकरांनी ‘थ्री’ आणि ‘फोर स्टार’ रेटिंग दिले.

टॅग्स :खड्डेमुंबई महानगरपालिका