Join us
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशी  हवाला रॅकेट प्रकरणी ९ जणांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई

By मनीषा म्हात्रे | Updated: December 13, 2023 20:30 IST

याप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.

 

मुंबई : गुन्हे शाखेने अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांसाठी हवाला रॅकेट चालवल्याप्रकरणी  ९ बांगलादेशी नागरिकांना अटक केली. आरोपींनी बनावट कागदपत्राद्वारे आधारकार्ड व बँक खाती उघडल्याचे तपासात समोर आले. याप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशातून बेकायदेशीररित्या मुंबईत आणून कामधंदा मिळवून दिल्याप्रकरणी गुन्हे शाखेने अक्रम नूर नवी शेख(२६) या दलालाला अटक केली होती. आरोपी भारतातून कमवलेली रक्कम बांगलादेशात अवैध्यरित्या पाठवण्याचेही काम करत असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. आरोपीच्या चौकशीतून आणखीन आठ  बांगलादेशी नागरिकांना बेड्या ठोकण्यात गुन्हे शाखेला यश आले.

शेख हा मूळचा  बांगलादेशातील चितगाव राज्यातील नोरत्तमपूर येथील रहिवासी असून, सध्या वडाळा परिसरात राहायचा. आरोपी स्वतःही बांगलादेशातून बेकायदेशीररित्या भारतात आला होता. साथीदार शफीक याच्यासह तेथील नागरिकांना बांगलादेशातून बेकायदेशीररित्या भारतात आणण्यास सुरू केले. मुंबई परिसरात कामधंदा मिळवून देण्याचे काम शेख करत होता. त्यासाठी तो एका व्यक्तीमागे २० हजार रुपये घेत होता. कमिशन घेऊन त्याद्वारे बांगलादेशी नागरिकांनी भारतात कमावलेली रक्कम बांगलादेशात पाठवण्याचेही काम करत होता. शेख हा शिवडी स्थानकाजवळ येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष-६ च्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे बांगलादेशात रक्कम पाठवण्याच्या बहाण्याने त्याला जाळ्यात ओढून शिवडीतून अटकेची कारवाई केली आहे.

 

टॅग्स :गुन्हेगारीपोलिस