लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनविण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली असली तरी मुंबई महापालिकेने शाडूच्या मातीवर भर कायम ठेवला आहे. अधिकाधिक मंडळांनी शाडूच्या मातीने गणेशमूर्ती बनवाव्यात, असा पालिकेचा आग्रह आहे. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही या मातीचा पुरवठा सुरूच ठेवला आहे. आतापर्यंत मूर्तिकारांना ८३० टन शाडूच्या मातीचा पुरवठा करण्यात आला आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे. त्यानुसार मूर्तिकारांना मंडपांसाठी ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर जागा आणि मूर्ती साकारण्यासाठी शाडू माती मोफत पुरवित आहे. दरम्यान, नागरिकांनीही गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
६० हजार मूर्तींची निर्मिती मागील दोन वर्षांपूर्वी महापालिका प्रशासनाने मूर्तिकारांना शाडू माती मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. त्या पहिल्याच वर्षी चांगला प्रतिसाद लाभला. त्यावर्षी मूर्तिकारांना ४०० टन शाडू माती दिली होती. परंतु, मागील वर्षी ही मागणी वाढली आणि २०० पेक्षा अधिक मूर्तिकारांना ६११ टन शाडू माती महापालिकेने मोफत उपलब्ध करून दिली होती. मागील वर्षी सुमारे ६० हजार गणेश मूर्ती शाडू मातीपासून बनविल्या होत्या.
आवश्यकतेनुसार नेतात माती मूर्ती घडविण्यासाठी लागणारी पर्यावरणपूरक शाडू मातीही मूर्तिकारांना मोफत देण्यात येत आहे. काही मूर्तिकारांकडून मातीची मागणी केली असली तरी ही माती ठेवायला जागा नसल्याने मूर्तिकार आवश्यकतेनुसार तसेच गरजेनुसार माती घेऊन जात आहेत.
प्रत्येक परिमंडळांमध्ये २० लाख रुपयांची तरतूद महापालिकेने प्रत्येक परिमंडळांमध्ये माती खरेदीसाठी प्रत्येकी २० लाख रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे, त्यातून या शाडू माती खरेदी करून प्रत्येक परिमंडळांमधील वॉर्डांना पुरवठा केला जात आहे. मुंबईतील सर्व घरगुती गणेश मूर्ती बनविण्यासाठी सुमारे २० हजार टन माती पालिकेला उपलब्ध करून द्यावी लागणार आहे, यासाठी आमची तयारी असल्याचे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.