लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: सोमवारी सकाळपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसातही बेस्टच्या ३५ आगारांत बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ८३ टक्के मतदान झाले. या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी होणार असून, बेस्ट उपक्रमावर कोणाचा वचक राहणार हे स्पष्ट होणार आहे. गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या बेस्ट पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणूक मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर होणार असल्याने या निवडणुकीला महत्त्व आले आहे.
यंदाच्या निवडणुकीत समर्थ बेस्ट कामगार संघटना, बेस्ट राष्ट्रीय कर्मचारी सेना, दि इलेक्ट्रिक युनियन, एस् सी एस् टी वेल्फेअर असोसिएशन, बहुजन एम्प्लॅाइज युनियन या पाच संघटनाचे सहकार समृद्धी पॅनल एकत्र येऊन लढत आहेत, तर मनसे आणि उद्धव ठाकरे यांचे उत्कर्ष पॅनल यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. सोमवारी मतदानाच्या दिवशी १५ हजार १२३ मतदारांपैकी १२ हजार ६५६ मतदारांनी आपले मत दिले आहे.
मुंबईत पावसामुळे लोकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. मात्र त्यातही बेस्ट कर्मचाऱ्यांनी आमच्यावर विश्वास दाखवत प्रचंड संख्येने मतदान केले आहे. आमच्यावरील टीकेचा रोष मतदारांनी या मतदानाच्या रूपामध्ये केला आहे. या मतदानाचा निकाल निश्चितच आमच्या बाजूने असणार यात वाद नाही. - सुहास सामंत, अध्यक्ष, बेस्ट कामगार सेना
विजय १०० टक्के आहे. ज्या पद्धतीने मोठा पाऊस असतानाही ८३.६९ टक्के मतदान झाले हा परिवर्तनाचा विजय आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधातला असंतोष आणि आम्ही दिलेली वचने पूर्णत्वाकडे नेण्यासाठी कामगारांनी केलेले हे भरघोस मतदान आहे. २१ पैकी २१ जागा आम्ही जिंकू आणि हा विजय कामगारांसाठी समर्पित असेल.- आ. प्रसाद लाड, भाजप