१२ महिन्यांत ८२ लाख..! अटल सेतूवरून वाहनांचा झोकात प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 06:20 IST2025-01-13T06:19:51+5:302025-01-13T06:20:17+5:30
अटल सेतूचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्यावर्षी १२ जानेवारीला करण्यात आले होते.

१२ महिन्यांत ८२ लाख..! अटल सेतूवरून वाहनांचा झोकात प्रवास
मुंबई : मुंबईला थेट नवी मुंबईशी जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या शिवडी न्हावाशेवा अटल सेतूवरून वर्षभरात ८२ लाख ८१ हजार वाहनांनी प्रवास केला आहे. गेल्यावर्षी १३ जानेवारीपासून हा मार्ग वाहनांसाठी खुला करण्यात आला होता. या वर्षभरात दरदिवशी सरासरी २२,८१४ वाहनांनी या मार्गावरून प्रवास केला असून, एमएमआरडीएच्या ७० हजार वाहनांच्या लक्षापासून अद्याप दूर आहे.
अटल सेतूचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्यावर्षी १२ जानेवारीला करण्यात आले होते. तर १३ जानेवारीपासून हा सेतू वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. हा सेतू २१.७ किलोमीटर लांबीचा असून, यातील १६.५ किलोमीटर लांबीचा पूल समुद्रात उभारण्यात आला आहे. एमएमआरडीएकडून या पुलाच्या उभारणीवेळी त्यावरून दरदिवशी ७० हजार वाहने धावतील, असा अंदाज वर्तविला होता. मात्र, १३ जानेवारी २०२४ ते ११ जानेवारी २०२५ या काळात या मार्गावरून केवळ ८२,८१,५२४ वाहनांनीच धाव घेतली आहे. त्यामध्ये ७७ लाख ०५ हजार कारचा समावेश आहे.
सी लिंक उभारण्यासाठी तब्बल १८ हजार कोटी रुपयांचा खर्च आला आहे. एमएमआरडीएने या प्रकल्पासाठी जायका या जपानी वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतले आहे. टोल वसुलीतून या कर्जाची परतफेड केली जाणार आहे. त्यातून या सी लिंकवरून प्रवासासाठी कार चालकांकडून तब्बल २५० रुपये टोल आकारला जात आहे. त्यातून टोलदर अधिक असल्यानेही वाहन संख्या वाढण्यात काही मर्यादा असल्याचे वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.