मुंबई : वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया मेट्रो ११ मार्गिकेच्या उभारणीसाठी ८०१ कुटुंबे बाधित होणार असून, एकूण ७९६ बांधकामे तोडावी लागणार आहेत. यासह चार धार्मिक आणि प्रार्थनास्थळेही या कामात बाधित होणार आहेत. मुंबईमेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) केलेल्या सामाजिक प्रभाव मूल्यांकन अहवालावरून ही बाब समोर आली आहे. कासारवडवली ते वडाळा मेट्रो ४ मार्गिकेचा दक्षिण मुंबईपर्यंत विस्तार करण्यासाठी मेट्रो ११ मार्गिका महत्त्वपूर्ण आहे. या मेट्रो मार्गिकेची लांबी १७.५१ किमी आहे. त्यावर एकूण ११ स्थानके असतील. एमएमआरसीने या मेट्रोचा प्रस्ताव यापूर्वीच राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. आता एमएमआरसीने या मेट्रो मार्गिकेचा पर्यावरणीय प्रभाव अहवाल आणि सामाजिक प्रभाव मूल्यांकन अहवाल नागरिकांच्या सूचना व हरकतींसाठी जाहीर केला आहे. ही मेट्रो मार्गिका गर्दीच्या अशा भायखळा, नागपाडा, भेंडीबाजार या भागातून जाणार आहे. या भागातील रस्तेही चिंचोळे आहेत. त्यामुळे या मेट्रो मार्गिकेची स्थानके उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागा आवश्यक आहे. त्यातून ७९६ बांधकामे पूर्णतः बाधित होत असून, यात ५९० रहिवासी, २०१ व्यावसायिक आणि पाच व्यावसायिक आणि रहिवासी अशी एकत्रित बांधकामे आहेत. यातील सर्वाधिक बांधकामे प्रस्तावित वडाळा स्थानकाच्या कामासाठी तोडावी लागणार आहेत.
वडाळ्यात ३२४ घरे तोडावी लागणार वडाळ्यातील म्हाडा चाळ आणि कोकरी आगार येथील ३२४ घरे तोडावी लागणार आहेत. त्याखालोखाल भेंडी बाजार मेट्रो स्थानकाच्या उभारणीसाठी २०५ कुटुंब बाधित होणार आहेत. यात मियां अहमद चोटाणी रस्त्यावरील एका सहा मजली इमारतीतील रहिवाशांचा समावेश आहे. या भागात दोन जैन मंदिरे असून, त्यामध्ये रहिवासी सुविधा आहे. यातील ४८ भाडेकरू बाधित होणार आहेत.
कोणत्या स्थानकासाठी किती बांधकामे बाधित?आणिक डेपो व कारशेड १५५वडाळा डेपो स्टेशन ३२४गणेशनगर स्टेशन १शिवडी ६हाय बंदर ४दारूखाना १भायखळा १२नागपाडा ९३भेंडीबाजार २०५
२०० वर्षे जुनी मंदिरेमेट्रो ११ मार्गिकेच्या कामादरम्यान ४ प्रार्थनास्थळे बाधित होण्याची शक्यता आहे. त्यात दोन जैन मंदिरे, एक हनुमान मंदिर आणि एका बौद्ध विहाराचा समावेश आहे. भेंडी बाजार भागातील ही दोन जैन मंदिरे २०० वर्ष जुनी आहेत, तर पंचशीलनगर येथील बौद्ध विहार आणि शिवडी येथील हनुमान मंदिर ही या प्रकल्पात बाधित होणार आहे.