लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : खराब हस्ताक्षर सुधारण्यासाठी एका ट्युशन टीचरने ८ वर्षीय विद्यार्थ्याच्या हाताला मेणबत्तीने चटका दिल्याचा धक्कादायक प्रकार मालाड पूर्वेकडील पिंपरीपाडा परिसरात घडला. या प्रकरणी कुरार पोलिसांनी राजश्री राठोड या शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार मुस्तकीन गुलाम रसूल खान (५०) यांचा मुलगा मोहम्मद हमजा खान (८) हा गोरेगाव पूर्वेकडील गोकुळधाम परिसरात राहणाऱ्या राठोडकडे घरगुती शिकवणी घेण्यासाठी जायचा. २८ जुलै रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास नेहमीप्रमाणे मुलगा ट्युशनला गेला. त्यानंतर रात्री नऊ वाजता राठोडने खान यांना फोन करून मुलाला घरी घेऊन जाण्यास सांगितले. खान यांची मुलगी राठोड हिच्या घरी गेली असता मोहम्मदच्या उजव्या तळहाताला जखम होऊन तो रडत असल्याचे तिच्या लक्षात आले.
त्यावर मुलीने तो का रडतोय, अशी विचारणा राठोड यांच्याकडे केली. त्यावर अभ्यासाचा कंटाळा येतो म्हणून तो नाटक करतो आहे, असे राठोडने सांगितले. मुलगा घरी आल्यावर खान यांनी हातावरील जखमेबाबत विचारले असता मुलाने हस्ताक्षर चांगले नसल्याने पेटत्या मेणबत्तीवर हात धरून टीचरने शिक्षा दिल्याचे सांगितले. याचा जाब विचारल्यावर राठोडनेही त्याला दुजोरा दिल्याचे खान यांनी कुरार पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.