Join us

८ पाकिस्तानी ड्रग तस्करांना २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा; मुंबईतील विशेष न्यायालयाचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 13:01 IST

शत्रू देशांकडून भारतीयांच्या आरोग्याला घातक आणि जीवघेण्या वस्तूंच्या तस्करीला चाप बसावा, यासाठी असे कठोर पाऊल उचलल्याचे विशेष न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुंबई : दोनशे किलो अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी आठ पाकिस्तानी नागरिकांना मुंबईतील विशेष न्यायालयाने बुधवारी २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. शत्रू देशांकडून भारतीयांच्या आरोग्याला घातक आणि जीवघेण्या वस्तूंच्या तस्करीला चाप बसावा, यासाठी असे कठोर पाऊल उचलल्याचे विशेष न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी यावेळी स्पष्ट केले.

अलिबक्ष सिंधी (४८), मकसूद मसिम (५४), मोहम्मद सिंधी (५५), मोहम्मद अहमद इनायत (३७), मोहम्मद युसूफ गगवानी (५८), मोहम्मद युनूस सिंधी (४४), मोहम्मद गुलहसन बलोच (४०) गुलहसन सिंधी (५०) अशी आरोपींची नावे आहेत. २०१५ मध्ये या आठ पाकिस्तानी नागरिकांना गुजरात किनारपट्टीलगत भारतीय तटरक्षक दलाने अटक केली होती. यावेळी त्यांच्या बोटीतून तब्बल सात कोटी रूपये किंमतीचे २३२ किलो हेरॉईन जप्त करण्यात आले होते. अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत नियुक्त विशेष न्यायालयासमोर बुधवारी हे प्रकरण सुनावणीसाठी आले.

हा साठा भारतामध्ये पोचवण्यात आरोपींना यश आले असते तर देशात त्याचे वितरण आणि विक्रीच्या निमित्ताने गुन्हेगारीतही वाढ झाली असती. त्यातही भारताचा शत्रू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानमधील हे गुन्हेगार असल्याने त्यांच्याबाबत कोणत्याही प्रकारची सौम्य भूमिका घेता येणार नाही, असे निरीक्षणही यावेळी न्यायाधीशांनी नोंदवले. 

टॅग्स :न्यायालयपाकिस्तानअमली पदार्थतुरुंग