कोस्टलवरून ८० लाख वाहनांचा प्रवास, २६ जानेवारीला अखेरचा टप्पा सेवेत
By सीमा महांगडे | Updated: January 16, 2025 06:04 IST2025-01-16T06:03:38+5:302025-01-16T06:04:01+5:30
सध्या कोस्टल रोडच्या उत्तर व दक्षिण वाहिनीवरून दिवसाला सरासरी दोन हजारांहून अधिक वाहने प्रवास करीत असल्याची नोंद झाली आहे.

कोस्टलवरून ८० लाख वाहनांचा प्रवास, २६ जानेवारीला अखेरचा टप्पा सेवेत
मुंबई : पालिकेच्या कोस्टल रोडवरील वेगवान वाहतुकीला मुंबईकरांची पसंती मिळत आहे. मागील वर्षातील मार्च ते डिसेंबर २०२४ पर्यंतच्या १० महिन्यांत वरळी ते मरिन ड्राइव्ह मार्गावरून (दक्षिण वाहिनी) ५० लाखांहून अधिक वाहनांनी प्रवास केला आहे. तर त्यानंतर खुल्या झालेल्या मरिन ड्राइव्ह ते वांद्रे या उत्तर वाहिनीवरून सात महिन्यांत ३२ लाखांहून अधिक वाहनांनी प्रवास केला आहे.
धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची (कोस्टल रोड) वरळी ते मरिन ड्राइव्ह अशी दक्षिण वाहिनी मार्गिका मार्चमध्ये खुली झाली. तर उत्तर वाहिनी ११ जूनपासून सुरू झाली. हा मार्ग खुला झाल्यानंतर मुंबईकरांचा वरळी आणि मरिन ड्राइव्हदरम्यानचा अर्धा ते पाऊण तासाचा प्रवास दहा-पंधरा मिनिटांवर आला आहे. सध्या कोस्टल रोडच्या उत्तर व दक्षिण वाहिनीवरून दिवसाला सरासरी दोन हजारांहून अधिक वाहने प्रवास करीत असल्याची नोंद झाली आहे.
सध्या २४ तास सुरू
कोस्टल रोड सुरुवातीला शनिवार आणि रविवारी विविध कामांसाठी बंद ठेवण्यात येत होता. मात्र, आता या प्रकल्पाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, सी-लिंकपर्यंत विस्ताराचे कामही अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे सप्टेंबरपासून हा मार्ग २४ तास सुरू करण्यात आला आहे. या मार्गावरून सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत मरिन लाइनच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे.
२६ जानेवारीला अखेरचा टप्पा सेवेत
कोस्टल रोड विस्तारात मरिन डाइव्ह ते वांद्रे-वरळी सी लिंकच्या दिशेने जाण्यासाठी शेवटचा गर्डर जोडण्याचे काम पूर्ण झाले असून, हा टप्पा येत्या प्रजासत्ताक दिनी अर्थात २६ जानेवारीला वाहनचालकांसाठी खुला करण्यात येणार आहे.
वाहनांची संख्या
महिना दक्षिण उत्तर
मार्गिका मार्गिका
मार्च २,६३,६१० सुरू नाही
एप्रिल ४,३६,१५० सुरू नाही
मे ५,२८,५१९ सुरू नाही
जून ५,२७,३८१ ४,३८,१३१
जुलै ५,४६,१८६ ४,६९,३३७
ऑगस्ट ६,६४,४९८ ६,०७,९३४
सप्टेंबर ५,४५,९३४ ४,८४,४७२
ऑक्टोबर ४,९४,८४२ ३,०१,१३८
नोव्हेंबर ५,१७,४६४ ४,५६,७९३
डिसेंबर ४,८५,०८५ ४,५१,९२५