Join us  

राज्यात ७.४ टक्के गर्भवतींच्या प्रसूतीत गुंतागुंत; ३३.९ टक्के गर्भवतींना प्रसूतीवेळी भासते रक्ताची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 6:07 AM

सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती

- स्नेहा मोरे मुंबई : सुदृढ व सुरक्षित गर्भवतींसाठी शासनाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. मात्र तरीही राज्यात एप्रिल ते नोव्हेंबर या काळात ७.४ टक्के गर्भवतींच्या प्रसूतीत गुंतागुंत निर्माण झाल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. तर ३३.९ टक्के गर्भवतींना प्रसूतीदरम्यान रक्ताची गरज भासल्याचेही आरोग्य विभागाने सांगितले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत गुंतागुंतीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे राज्यात अजूनही सुरक्षित मातृत्वापासून गर्भवती वंचित असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या वर्षी राज्यात गर्भवतींच्या प्रसूतीच्या वेळी गुंतागुंत होण्याचे प्रमाण ६.६ टक्के होते; तर ३१.९ टक्के गर्भवतींना प्रसूतीदरम्यान रक्ताची गरज भासली होती. यंदा एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या काळात अकोला जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ५०.२ टक्के गर्भवतींच्या प्रसूतीत गुंतागुंत निर्माण झाली; तर यवतमाळ जिल्ह्यात सर्वांत कमी ०.२ टक्के गर्भवतींना प्रसूतीदरम्यान रक्ताची गरज भासली.देशात दररोज सुमारे १५०० महिला आणि किशोरवयीन मुली गर्भधारणा आणि बाळाच्या जन्माशी संबंधित समस्येने मरण पावतात.

कुपोषणाच्या समस्येमुळे दरवर्षी सुमारे १० दशलक्ष महिला आणि किशोरवयीन मुलींना गर्भधारणेदरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. बऱ्याचदा बाळांना संसर्ग होतो. अपंगत्व येते. त्यामुळे गर्भधारणेदरम्यान आई व गर्भाची विशेष काळजी घेणे आवश्यक ठरते. गर्भवतींच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. गरोदर मातांच्या अशक्तपणामुळे जगभरात दरवर्षी सुमारे ३० लाख मृत बाळांचा जन्म होत असल्याचे समोर आले आहे.

सुरक्षित मातृत्वासाठी प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचे

प्रसूतीकळा सुरू झाल्यापासून १० ते १२ तासांत प्रसूती होते. साधारणपणे २ ते ५ टक्के प्रसूतींदरम्यान अतिरक्तस्राव होऊ शकतो. यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आधीच घेणे अपेक्षित असते. कधीकधी प्रचंड रक्तस्राव होतो व रक्त द्यावे लागते. याच्या महत्त्वाच्या कारणांमध्ये अतिरक्तस्राव, जंतुसंसर्ग, उच्चरक्तदाब, अ‍ॅनिमिया ही कारणे प्रमुख आहेत. प्रसूतीदरम्यान मातेच्या सुरक्षेसाठी मोठा पल्ला गाठायचा आहे. सर्व प्रसूती रुग्णालयांत आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली होणे हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे.- डॉ. करिश्मा गोरे, स्त्रीरोगतज्ज्ञ

सुरक्षित मातृत्वाची त्रिसूत्री

गरोदर महिलांना निरोगी आणि सुरक्षित बाळंतपणाची खात्री देणे म्हणजेच सुरक्षित मातृत्व म्हणता येईल. निरोगी प्रजननासाठी सुरक्षित मातृत्व महत्त्वाचा घटक ठरतो. सुरक्षित मातृत्व म्हणजेच निरोगी गर्भधारणा आणि बाळाचा सुरक्षित जन्म देण्याची आईची क्षमता. याची सुरुवात गर्भधारणेपूर्वीपासूनच होते.च्गर्भधारणेपूर्वी मातेचे पोषण आणि निरोगी-सुदृढ जीवनशैली, बाळ जन्मापूर्वी घेतलेली योग्य काळजी, शक्य होईल तेथे आरोग्याविषयी उद्भवलेल्या समस्यांवर वेळीच योग्य उपचार व प्रतिबंध ही सुरक्षित मातृत्वाची त्रिसूत्री असल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.

टॅग्स :प्रेग्नंसीआरोग्यडॉक्टररक्तपेढी