सोसायट्यांमध्ये ७०२ मतदान केंद्रे, मतटक्का वाढविण्यासाठी सुविधा; गोंधळ, गैरसोय टाळण्याचा प्रशासनाचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 13:37 IST2026-01-02T13:36:19+5:302026-01-02T13:37:31+5:30
निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखून मतदारांना सुलभ आणि सुरक्षित मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी २२७ प्रभागनिहाय मतदान केंद्राची अंतिम यादी तयार करण्यात आली आहे. त्यात शाळा, महाविद्यालयांसह शासकीय-निमशासकीय इमारती तसेच खासगी इमारतींचीही मतदान केंद्रासाठी निवड करण्यात आली आहे.

सोसायट्यांमध्ये ७०२ मतदान केंद्रे, मतटक्का वाढविण्यासाठी सुविधा; गोंधळ, गैरसोय टाळण्याचा प्रशासनाचा प्रयत्न
मुंबई : महापालिका क्षेत्रात एक कोटी तीन लाख ४४ हजार ३१५ मतदार असून, त्यांच्याकरिता एकूण १० हजार २३१ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये एकूण ७०२ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. यापैकी १८१ मतदान केंद्रे बंदिस्त जागांमध्ये, ३१२ केंद्रे अर्धबंदिस्त जागांमध्ये, तर २०९ मतदान केंद्रे खुल्या जागांमध्ये असणार आहेत, अशी माहिती पालिका आयुक्त आणि जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी दिली.
निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखून मतदारांना सुलभ आणि सुरक्षित मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी २२७ प्रभागनिहाय मतदान केंद्राची अंतिम यादी तयार करण्यात आली आहे. त्यात शाळा, महाविद्यालयांसह शासकीय-निमशासकीय इमारती तसेच खासगी इमारतींचीही मतदान केंद्रासाठी निवड करण्यात आली आहे.
खासगी इमारतींमध्ये एकूण पाच हजार १४३ मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. त्यात दोन हजार ७१० मतदान केंद्रे बंदिस्त जागांमध्ये, एक हजार ३७८ मतदान केंद्रे अर्धबंदिस्त जागांमध्ये तसेच एक हजार ५५ मतदान केंद्रे खुल्या जागांमध्ये असतील. प्रत्येक प्रभागातील लोकसंख्या, मतदारांची संख्या लक्षात घेऊन मतदान केंद्रांची आखणी करण्यात आली आहे.
मतदार साहाय्य केंद्रामुळे नावे शोधणे सोपे
मतदान केंद्रांवर वीजपुरवठा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृहे, रॅम्प आदींची सुविधा करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्याची पाहणी आणि पडताळणी केली आहे.
मतदारांना त्यांची नावे शोधण्यासाठी मतदान केंद्रानजीक ‘मतदार साहाय्य केंद्र’ स्थापित करण्यात येणार असल्याचेही गगराणी यांनी नमूद केले.
मुंबईत एकूण १०,२३१ मतदान केंद्रे निश्चित
पालिकेच्या सात परिमंडळांतील २४ वॉर्ड तसेच २३ मध्यवर्ती मतदान केंद्रानुसार (आरओ) एकूण १० हजार २३१ मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. तेथे दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.