दहा वर्षांत पालिकेत ७०० फायली गायब, कालबद्ध चौकशीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 13:06 IST2025-01-18T07:33:04+5:302025-01-18T13:06:00+5:30
पश्चिम उपनगरात मोकळ्या जागेत केलेल्या रेस्टाॅरंटच्या बांधकामाची माहिती ‘माहिती अधिकारात’ मागितल्यावर संबंधित फाईल ‘मिसिंग’ आहे, असे लेखी उत्तर या खात्याने दिले आहे.

दहा वर्षांत पालिकेत ७०० फायली गायब, कालबद्ध चौकशीची मागणी
मुंबई : महापालिकेच्या इमारत बांधकाम प्रस्ताव विभागातून २०१५ पासून ७०० फायली गायब झाल्या असून अजूनही हे प्रकार थांबलेले नाहीत. पश्चिम उपनगरात मोकळ्या जागेत केलेल्या रेस्टाॅरंटच्या बांधकामाची माहिती ‘माहिती अधिकारात’ मागितल्यावर संबंधित फाईल ‘मिसिंग’ आहे, असे लेखी उत्तर या खात्याने दिले आहे.
पश्चिम उपनगरातील एका औद्योगिक परिसर सहकारी संस्थेच्या वतीने माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत मोकळ्या जागेवर अतिक्रमण केलेल्या रेस्टॉरंटला मंजुरी देण्यात आली आहे का, याविषयी अर्ज केला होता, तेव्हा फाईल ‘मिसिंग’ असल्याचे उत्तर देण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते गॉडफ्रे पिमेंटा यांनी हा अर्ज केला होता.
इमारत बांधकाम विभागात ५० हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आमदार अमित साटम यांनी २०१५ मध्ये विधानसभेत उपस्थित केला होता, तेव्हा सरकरकडून दोषींना शिक्षा व्हावी, यासाठी कालबद्ध चौकशीचे आश्वासन दिले होते. तसेच नुकत्याच मांडलेल्या कॅग अहवालात पालिकेतील महत्त्वपूर्ण त्रुटी उघड केल्या आहेत.
अर्जदाराची मागणी
इमारत बांधकाम विभागाकडून गहाळ झालेल्या फाईल्सची सखोल आणि कालबद्ध चौकशी सुरू करा. भ्रष्टाचार आणि मनी लाँड्रिंगच्या गंभीर आरोपांच्या चौकशीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो, अंमलबजावणी संचालनालयास सांगावे. निष्काळजीपणा, संगनमत किंवा भ्रष्टाचारासाठी दोषी अधिकारी आणि संस्थांवर कारवाई करा. सर्व विभागीय नोंदी आणि मंजूर योजनांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी मजबूत यंत्रणा कार्यान्वित करा, अशी मागणी अर्जदार पिमेंटा यांनी केली आहे.
पालिकेच्या इमारत बांधकाम खात्यातून ७०० फाईल्स गहाळ झाल्या आहेत. २०१५ मध्ये विधानसभेत हा घोटाळा मी उघड केला होता.
- अमित साटम, आमदार