‘टोरेस’मध्ये २०० रुपयांचे खडे हिरे म्हणून ७ हजारांना खपवले! ग्राहकांना विकला बनावट ऐवज

By सूर्यकांत वाघमारे | Updated: January 8, 2025 07:09 IST2025-01-08T07:08:51+5:302025-01-08T07:09:15+5:30

गुंतवणूकदारांचे पैसेही गेले

7 thousand rupees worth of diamonds were passed off as ‘Torres’! Customers were sold fake goods | ‘टोरेस’मध्ये २०० रुपयांचे खडे हिरे म्हणून ७ हजारांना खपवले! ग्राहकांना विकला बनावट ऐवज

‘टोरेस’मध्ये २०० रुपयांचे खडे हिरे म्हणून ७ हजारांना खपवले! ग्राहकांना विकला बनावट ऐवज

सूर्यकांत वाघमारे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: फसव्या योजना चालवून ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी चर्चेत आलेल्या टोरेस ज्वेलर्समधून ग्राहकांना बनावट हिरे विकल्याचेही समोर आले आहे. २०० ते ३०० रुपयांचे खडे हे ६ ते ७ हजारांना विकले आहेत.

नवी मुंबई पोलिसांनी तुर्भे येथील शोरूमच्या माध्यमातून झालेल्या फसवणूकप्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखा पोलिसांचा आर्थिक गुप्तवार्ता विभाग दहा दिवसांपासून तेथे चालणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवून होता. त्यानंतर तपास पथकाने बनावट ग्राहक बनून टोरेसमधून खरेदी केलेला हिरा बनावट असल्याचेही पडताळणीत समोर आले. यात २०० ते ३०० रुपयांचे हिरे त्या ठिकाणी ६ ते ७ हजार रुपयांना विकले जात होते. तसेच ग्राहकांना हिरे खरेदी केल्यास ९ टक्के रक्कम बोनस स्वरूपात ५०० ते ६०० रुपये परत केली जात होती. यामुळे ग्राहकांची झुंबड उडाली होती. याशिवाय सेमिनारमध्ये दागिने, हिरे खरेदी व गुंतवणुकीच्या माध्यमातून आठवड्याला मिळणारा नफा, बक्षिसे यांची माहिती देऊन गुंतवणूकदारांना गळाला लावले जात होते.

गुंतवणूकदारांची रक्कम विदेशात

टोरेस ज्वेलर्सच्या माध्यमातून प्लॅटिनम हर्न कंपनीचे संचालक व सदस्य हा संपूर्ण प्रकार हाताळत होते. त्यानुसार या कंपनीच्या प्रमुखांवर एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये दोन विदेशी तर एक भारतीयाचा समावेश आहे. त्यावरून गुंतवणूकदारांची रक्कम थेट देशाबाहेर पळवली गेल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

शेवटच्या आठवड्यात धमाका

काही दिवसांपासून टोरेसच्या प्रमुख व दलालांकडून गुंतवणुकीवर आठवड्याभरासाठी ऑफर घोषित केली होती. या आठवड्यात गुंतवणूक करणाऱ्यांना भेट स्वरूपात कार, मोबाइल दिले जाणार असल्याचे व ४० ते ६० टक्क्यांपर्यंत बोनस देण्याचेही आमिष दिले होते. त्यामुळे गेल्या दहा दिवसांत सर्वाधिक व्यक्तींनी गुंतवणूक व ऐवज खरेदी केला आहे.

‘टोरेस’ची तोडफोड करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, सोमवारी नागरिकांनी तुर्भे येथील टोरेस ज्वेलर्समध्ये घुसून तोडफोड केली. या प्रकाराबद्दल कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. टोरेस कंपनीच्या योजनेतून अनेकांची फसवणूक झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. यामुळे तुर्भे येथील टोरेसच्या बाहेर मोठ्या संख्येने गुंतवणूकदारांचा जमाव जमला होता. 

भिशी आली अन् गेली...

अंधेरीत राहणारे पालिका कर्मचारी कैलास जायभाय सांगतात, कार्यालयासमोर असलेल्या टोरेसबाहेरील गुंतवणुकीसाठीची गर्दी बघून माझाही विश्वास बसला. नुकतेच भिशीचे पैसे हाती आले होते. तेच पैसे ऑगस्ट महिन्यात थेट यात फिरवले. सुरुवातीला हफ्तेही मिळाले. मात्र, हा मोह महागात पडल्याचे ते सांगतात. 

वडिलांच्या बायपासचे पैसेही बुडाले

एका गुंतवणूकदार महिलेने वडिलांच्या बायपाससाठी ठेवलेले अडीच लाख रुपये यात गुंतवले. याबाबत आई-बाबांना समजले तर ते जगणार नाही अशी भीती त्यांनी वर्तवली आहे. पोलिसांकडूनच पैसे मिळण्याची आशा असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

Web Title: 7 thousand rupees worth of diamonds were passed off as ‘Torres’! Customers were sold fake goods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.