११ मिनिटांत ७ बॉम्बस्फोट, चर्चगेटवरुन सुटलेल्या लोकल लक्ष्य; मुंबईच्या लाईफलाइनमध्ये १८९ जणांचा गेला होता जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 13:24 IST2025-07-21T13:22:58+5:302025-07-21T13:24:46+5:30
मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील ११ आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे.

११ मिनिटांत ७ बॉम्बस्फोट, चर्चगेटवरुन सुटलेल्या लोकल लक्ष्य; मुंबईच्या लाईफलाइनमध्ये १८९ जणांचा गेला होता जीव
Mumbai Train Bomb Blast Case: मुंबईतील २००६ च्या साखळी ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व १२ आरोपींना मुंबई हायकोर्टाने सोमवारी निर्दोष मुक्तता केली. सरकारी वकील आरोपींविरुद्धचा खटला सिद्ध करण्यात अपयशी ठरले आहेत म्हणत कोर्टाने आरोपी निर्दोष असल्याचे म्हटलं. यापैकी एका आरोपीचा कोविड काळात मृत्यू झाला. ११ जुलै २००६ रोजी मुंबईतील पश्चिम मार्गावरील सात लोकलच्या डब्यांमध्ये साखळी स्फोट झाले होते. त्यात १८९ प्रवासी ठार झाले आणि ८२४ लोक जखमी झाले. स्फोटानंतर १९ वर्षांनी हा निर्णय देण्यात आला आहे.
मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणात हायकोर्टाने सर्व १२ आरोपींना निर्दोष ठरवलं. ७/११ मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण हे १९९२ च्या बॉम्बस्फोटानंतर मुंबईतील सर्वात मोठा हल्ला होता. ११ जुलै २००६ हा दिवस मुंबईकरांसाठी एखाद्या भयानक स्वप्नापेक्षा कमी नव्हता. या घटनेला अनेक वर्षे उलटल्यानंतर १९ वर्षांनी आलेल्या निकालाने सर्वांनाच धक्का बसला आहे. कनिष्ठ कोर्टाने पाच दोषींना मृत्युदंडाची, तर सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र हायकोर्टाने सर्वांना निर्दोष सोडले.
तत्कालीन महाराष्ट्र सरकारच्या आदेशावरून स्थापन झालेल्या तपास पथकाने या प्रकरणात १३ संशयितांना अटक केली होती, तर काही आरोपी पाकिस्तानात पळून गेले होते. २०१५ मध्ये कनिष्ठ न्यायालयाने या स्फोटात १२ आरोपींना दोषी ठरवले. त्यापैकी पाच जणांना मृत्युदंड आणि सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. पाच आरोपींच्या फाशीच्या शिक्षेवर मंजुरीसाठी सरकारने हायकोर्टात धाव घेतली होती.
कसे झाले स्फोट?
मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनमध्ये ११ जुलै २००६ रोजी खूप गर्दी होती. ऑफिसच्या कामानंतर लोक घरी परतत होते. त्यानंतर संध्याकाळी ६.२४ वाजता लोकल ट्रेनमध्ये पहिला स्फोट झाला आणि एकत्र गोंधळ उडाला. त्यानंतर वेगवेगळ्या स्थानकांवर एकामागून एक ७ बॉम्बस्फोट झाले तेव्हा पोलिस व्हॅन आणि रुग्णवाहिकांसह सर्व बचाव यंत्रणांना सतर्क करण्यात आले. माटुंगा रोड, वांद्रे, खार रोड, माहिम जंक्शन, जोगेश्वरी, भाईंदर आणि बोरिवली रेल्वे स्थानकांवर सलग सात स्फोट झाले. पहिला स्फोट ६:२४ वाजता, दुसरा ६:२४ वाजता, तिसरा ६:२५ वाजता, चौथा ६:२६ वाजता, पाचवा ६:२९ वाजता, सहावा ६:३० वाजता आणि सातवा स्फोट ६:३५ वाजता झाला.
पश्चिम मार्गावरील लोकल लक्ष्य
जवळपास ११ मिनिटांत हे सात स्फोट झाले. या बॉम्बस्फोटांमध्ये १ ते २ मिनिटांचे अंतर होते. वांद्रे-खार रोड, माटुंगा रोड-माहीम स्टेशन आणि मीरा रोड-भाईंदर दरम्यान ३ बॉम्बस्फोट झाले. माहीम, बोरीवली आणि जोगेश्वरी स्टेशनवरून गाड्या सुटत असताना आणखी ३ बॉम्बस्फोट झाले. बहुतेक मृत्यू माहीम रेल्वे स्टेशनवर झालेल्या बॉम्बस्फोटात झाले. चर्चगेट-बोरीवली दरम्यान लोकल ट्रेनमध्ये ४३ प्रवासी मृत्युमुखी पडले. मीरा रोड-भाईंदर लोकल ट्रेनमध्ये ३१ जणांचा मृत्यू झाला. चर्चगेट-विरार लोकल ट्रेनमध्ये २८ आणि चर्चगेट-बोरीवली लोकलमध्ये २८ प्रवासी, चर्चगेट-विरार (बोरीवली) लोकलमध्ये २६, चर्चगेट-बोरीवली (वांद्रे-खार रोड) लोकलमध्ये २२ आणि चर्चगेट लोकलमध्ये ९ जणांचा मृत्यू झाला.
प्रेशर कुकरचा वापर करुन हे स्फोट करण्यात आले. स्फोटाची तीव्रता इतकी होती डब्यांच्या चिंधड्या उडाल्या होत्या. हे स्फोट लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लासच्या डब्यांमध्ये झाले. चर्चगेटपासून निघालेल्या गाड्यांना लक्ष्य करण्यात आले कारण यामध्ये ऑफिसहून घरी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी जास्त असते.
या बॉम्बस्फोटाची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाने घेतली होती. मार्च २००६ मध्ये, लष्कर-ए-तोयबाच्या आझम चीमाने बहावलपूरमधील त्याच्या घरात सिमी आणि लष्करच्या दोन गटांच्या प्रमुखांसह या स्फोटांचा कट रचला होता. मे २००६ मध्ये, ५० तरुणांना बहावलपूरमधील प्रशिक्षण शिबिरात पाठवण्यात आले होते. त्यांना बॉम्ब बनवण्याचे आणि बंदुका चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. दहशतवाद विरोधी पथकाने २० जुलै २००६ ते ३ ऑक्टोबर २००६ दरम्यान आरोपींना अटक केली.
हे होते मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी
कमाल अहमद अन्सारी (३७) (कोविडमुळे मृत्यू)
तन्वीर अहमद अन्सारी (३७)
मोहम्मद फैजल शेख (३६)
एहतेशम सिद्दीकी (३०)
मोहम्मद माजिद शफी (३२)
शेख आलम शेख (४१)
मोहम्मद साजिद अन्सारी (३४)
मुज्जमिल शेख (२७)
सोहेल मेहमूद शेख (४३)
जमीर अहमद शेख (३६)
नावेद हुसेन खान (३०)
आसिफ खान (३८)