Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी मुख्य शूटरसह ७ जेरबंद; अटकेतील आरोपींची संख्या १२ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 10:43 IST

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ फेब्रुवारीला मध्यरात्री १२:४५ वाजता जुहू येथील शेट्टी टॉवरवर हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. या प्रकरणी जुहू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुंबई : प्रसिद्ध चित्रपट निर्माते रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील निवासस्थानी करण्यात आलेल्या गोळीबारप्रकरणी मुख्य शूटरसह सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही संयुक्त कारवाई केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ फेब्रुवारीला मध्यरात्री १२:४५ वाजता जुहू येथील शेट्टी टॉवरवर हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. या प्रकरणी जुहू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान या हल्ल्यात लॉरेन्स बिष्णोई टोळीचा शुभम लोणकर सामील असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात शस्त्र तसेच रसद पुरविणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, या टोळीने चित्रपटसृष्टी, उद्योगपती आणि सर्वसामान्यांमध्ये दहशत निर्माण करून वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने हा हल्ला घडवून आणला होता. आरोपींनी हल्ल्यापूर्वी मुंबईत येऊन संबंधित ठिकाणाची रेकी केली होती, असे त्यांनी चौकशीत कबूल केले. त्यांनी १ फेब्रुवारीच्या रात्री टोळीने पुरविलेल्या सेमी-ऑटोमॅटिक पिस्तुलातून गोळीबार केला होता.

अटक केलेल्या काही आरोपींनी मुख्य शूटर व त्याच्या साथीदारांना आश्रय देण्याबरोबरच साधनसामग्री आणि इतर मदत पुरविल्याचेही उघड झाले आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या प्रभावाखाली येऊन काही आरोपी या गुन्ह्यात सामील झाल्याचेही स्पष्ट झाले आहे, त्यानुसार तपास सुरू आहे.

आरोपींची नावे...

संयुक्त कारवाईत १५ फेब्रुवारीला हरयाणातील झज्जर, उत्तर प्रदेशातील आग्रा व नोएडा तसेच गाझियाबाद परिसरातून सात जणांना अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये शूटर दीपक रमेश चंद्र (२४) याच्यासह सनी राकेश कुमार (२३), सोनू विनोद कुमार (२३), रितिक विनोद कुमार (२२), विष्णू कुशवाहा सूरज पाल (२६), जतिन भारद्वाज (२४) आणि विशाल बालकराम यांचा समावेश आहे.

मुंबई : चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावरील गोळीबार प्रकरणात अटक केलेल्या सात आरोपींना ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका)’ प्रकरणांची सुनावणी करणाऱ्या विशेष न्यायालयाने सोमवारी २५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ‘हा गुन्हा लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या शुभम लोणकरने शेट्टी यांना इजा पोहोचविण्याच्या आणि दहशत निर्माण करून वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या हेतूने केला होता,’ असे पोलिसांच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले.

कटाचा उलगडा करण्यासाठी, तसेच शुभम लोणकरसह फरार आरोपींचा ठावठिकाणा शोधण्यासाठी आरोपींची कोठडी आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले, तसेच या घटनेत वापरलेली शस्त्रे अद्याप जप्त करण्यात आलेली नसल्याचेही पोलिसांनी नमूद केले. त्याचप्रमाणे, प्राथमिक तपासात शूटर दीपक शर्मा आणि आणखी एका आरोपीने गोळीबारापूर्वी शेट्टी यांच्या निवासस्थानाची रेकी केल्याचे उघड झाले आहे, असा दावा सरकारी वकिलांनी केला. या कटाची आखणी लोणकरने केली. गोळीबारासाठी लागणारा पैसा आणि शस्त्रे त्यानेच पुरविली. घटनेनंतर आरोपींनी परस्पर संपर्कासाठी वापरलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मोबाइलमधून हटविले, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. लोणकर आणि त्याच्या टोळीने यापूर्वीही अशाच प्रकारचे गुन्हे केले असून, ते पुढेही असे गुन्हे करण्याची भीती पोलिसांनी न्यायालयात व्यक्त केली. 

..म्हणून रोहित शेट्टी त्यांचे टार्गेट

रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा मुख्य सूत्रधार शुभम लोणकर याचा राजस्थानमधील साथीदार गोलू पंडित आणि त्याच्या संघटित टोळीने अलीकडेच एका बड्या व्यक्तीकडून पाच कोटींची खंडणी उकळली. तो कट यशस्वी झाल्यानंतर लोणकर आणि त्याच्या साथीदारांनी शेट्टी यांना टार्गेट करण्याचा कट आखला. खंडणीसाठी शेट्टी यांच्यासारख्या दिग्दर्शकाला धमकावल्यानंतर संपूर्ण देशात टोळीचे नाव होईल, हा त्यामागील हेतू होता. ही माहिती आरोपींच्या चौकशीतून पुढे आल्याचे उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सने सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Rohit Shetty Shooting: Main Shooter, 7 Arrested; Total Reaches 12

Web Summary : Seven arrested, including the main shooter, in the Rohit Shetty firing case. The Lawrence Bishnoi gang aimed to create terror for extortion. They did a recce before firing semi-automatic pistols at Shetty's residence. Arrested suspects are remanded to police custody until February 25.
टॅग्स :रोहित शेट्टीपोलिस