हवा आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी महानगर पालिकेला केंद्राचा ६३० कोटींचा निधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 12:37 IST2024-01-08T12:35:34+5:302024-01-08T12:37:03+5:30
मुख्यमंत्री आठवड्यातून एकदा रस्त्यावर उतरून या मोहिमेचा आढावा घेत आहेत

हवा आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी महानगर पालिकेला केंद्राचा ६३० कोटींचा निधी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने गेल्या काही महिन्यांपासून जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार संपूर्ण स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले आहे. स्वतः मुख्यमंत्री आठवड्यातून एकदा रस्त्यावर उतरून या मोहिमेचा आढावा घेत आहेत. मुंबई महापालिकेच्या या प्रयत्नांना केंद्र सरकारने आर्थिक बळ पुरवले आहे. हवा आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र पालिकेला ६३० कोटी रुपयांचा निधी देणार आहे.
पालिकेला राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाकडून हवेची गुणवत्ता सुधारण्याठी ६२० कोटी रुपये दिले आहेत. या निधीतून स्वच्छता राखण्यासाठी विविध यंत्रे आणि वाहनांची खरेदी, ई-बसची खरेदी, बॅटरी चार्जिंग स्टेशनची उभारणी, कचऱ्यापासून वीज आदी कामे अपेक्षित आहेत. प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने नोव्हेंबर महिन्यापासून कृती आरखडा तयार केला असून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.