60 अवयवदान; 162 जणांना जीवदान; मुंबई विभागाने पार केला गेल्यावर्षीचा आकडा; यंदा १० मेंदूमृत दात्यांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 15:33 IST2024-12-31T15:33:21+5:302024-12-31T15:33:47+5:30
गेल्यावर्षी मुंबई विभागात एकूण ५० मेंदूमृत अवयवदान झाले होते, त्यामुळे १४३ रुग्णांना जीवदान मिळाले आहे.

60 अवयवदान; 162 जणांना जीवदान; मुंबई विभागाने पार केला गेल्यावर्षीचा आकडा; यंदा १० मेंदूमृत दात्यांची वाढ
मुंबई : गेल्या काही वर्षांत अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहेत. अशात अवयवांसाठी प्रतीक्षेत असणाऱ्या रुग्णांची प्रतीक्षा यादी वर्षागणिक मोठी होत आहे. यावर्षी २०२४ मध्ये ६० मेंदूमृत अवयवदात्यांनी अवयवदान केल्यामुळे १६२ रुग्णांना जीवदान मिळाले आहे. गेल्यावर्षीच्या २०२३च्या तुलनेत १० मेंदूमृत अवयवदान वाढले असल्याची माहिती मुंबई विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीने दिली.
गेल्यावर्षी मुंबई विभागात एकूण ५० मेंदूमृत अवयवदान झाले होते, त्यामुळे १४३ रुग्णांना जीवदान मिळाले आहे. आपल्याकडे मेंदूमृत व्यक्तीचे अवयवदान मोठ्या प्रमाणात होत नाही. त्यासाठी जनजागृतीची गरज असून, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातून यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. गेल्या काही वर्षांत अवयव निकामी झालेल्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्यांची यादी वाढत आहे. एका वर्षाला मेंदूमृत व्यक्तीकडून अवयव दान होण्याची संख्या आणि अवयवाची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या यामध्ये मोठी तफावत आहे.
मुंबई महानगर प्रदेशात मेंदूमृत व्यक्तीकडून मिळणाऱ्या अवयवदानाच्या नियमनाचे काम मुंबई विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीमार्फत करण्यात येते. त्यांच्याकडे मुंबई विभागातून अवयवांसाठी प्रतीक्षेत असणाऱ्या रुग्णांची नोंदणी केलेली असते. त्यानुसार अवयव प्राप्त झाल्यानंतर त्या क्रमवारीने अवयवांचे वाटप करण्यात येते.
त्वचा आणि हाडाचेही दान
- २०२३ मध्ये दोन अवयवदात्यांनी त्वचा तर सात अवयवदात्यांनी हाडांचे दान केले होते. तर २०२४ मध्ये दोन अवयवदात्यांनी त्वचा तर ९ अवयवदात्यांनी हाडांचे दान केले होते. अनेकवेळा भाजलेल्या रुग्णांमध्ये त्वचेची गरज भासत असते.
- त्यावेळी त्या दान केलेल्या त्वचेचा वापर होऊ असतो. तर काही वेळा कॅन्सरच्या रुग्णांमध्ये हाडांचा कॅन्सर झाला असतो, त्यावेळी या दान केलेल्या हाडांचा वापर होत असतो.
डोळ्यांचे दान वाढले
२०१३ मध्ये १६ डोळे दान करण्यात आले होते.
२०२४ मध्ये २१ डोळे दान करण्यात आले आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा अधिक प्रमाणात अवयवदान झाले आहे. मी आणि समितीचे सरचिटणीस डॉ. भारत शाह मुंबईतील विविध वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन अवयवदानासंबंधी जनजागृती करणारी व्याख्याने घेत असतो. मात्र मेंदूमृत अवयवदात्यांचे ऑडिट होणे गरजेचे आहे. यासाठी तामिळनाडू राज्यात उच्च अधिकार समिती स्थापन केली आहे. त्या पद्धतीने आपल्याकडेसुद्धा समिती स्थापना केली पाहिजे.
-डॉ. सुरेंद्र माथूर, अध्यक्ष, मुंबई विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती
अवयवनिहाय आकडेवारी
वर्ष मूत्रपिंड यकृत हृदय फुप्फुस स्वादुपिंड आतडे एकूण अवयवदाते
२०२२ ७० ३७ ९ ५ २ १ १२४ ४७
२०२३ ७५ ४४ १६ ६ २ ० १४३ ५०
२०२४ ९३ ५१ ८ ७ २ १ १६२ ६०