‘कूपर’मध्ये दोन महिन्यांत ६ रुग्णांना उंदरांचा चावा; माहिती अधिकारात उघड; रुग्ण, नातेवाईक संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 09:13 IST2025-10-05T09:13:12+5:302025-10-05T09:13:34+5:30
सार्वजनिक रुग्णालयात अनेक वेळा अस्वच्छता असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या संदर्भात अनेकदा स्थानिक लोकप्रतिनिधी प्रश्न उपस्थित करत असतात.

‘कूपर’मध्ये दोन महिन्यांत ६ रुग्णांना उंदरांचा चावा; माहिती अधिकारात उघड; रुग्ण, नातेवाईक संतप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महापालिकेच्या अखत्यारीतील रुग्णालयात दोन रुग्णांना उंदीर चावल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्यामुळे रुग्णालय व्यवस्थपनाविरोधात नातेवाईक आणि रुग्णांमध्ये प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला. शासनाने या घटनेची दखल घेऊन प्रतिबंधात्मक पावले उचलली होती. दरम्यान, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात या रुग्णालयात सहा रुग्णांना उंदीर चावल्याच्या घटना घडल्या, असे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. विशेष म्हणजे याची रीतसर नोंदसुद्धा डायरीमध्ये करण्यात आली आहे.
सार्वजनिक रुग्णालयात अनेक वेळा अस्वच्छता असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या संदर्भात अनेकदा स्थानिक लोकप्रतिनिधी प्रश्न उपस्थित करत असतात. कूपर रुग्णालयात उंदीर चावल्याची घटना प्रचंड गाजली. त्यांनतर प्रशासनाने विशेष प्रयत्न करून उंदीर प्रतिबंध करण्यास कडक पावले उचलली होती. मात्र पुन्हा रुग्णालयातील रुग्णांना उंदीर चावल्याच्या घटनेने रुग्णांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे.
उंदीर पकडणे झाले गरजेचे
रुग्णालय स्वच्छ करणाऱ्या कंत्राटदाराला अतिरिक्त काम करण्यास सांगण्यात आले होते. तसेच ज्या ठिकाणाहून उंदीर रुग्णालय परिसरात विशेष करून वॉर्डमध्ये प्रवेश करू शकतात, त्या ठिकाणचे मार्ग बंद केले होते.
उंदीर पकडण्याचे सापळे लावण्यात आले होते. त्या मोहिमेत शेकडो उंदीर पकडण्यात आले होते.
जुहू पोलिसांच्या अहवालात सहा प्रकरणांची आहे नाेंद
माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी माहितीच्या अधिकारातून दोन महिन्यांत रुग्णालयात किती उंदीर चावले या संदर्भातील माहिती जुहू पोलिसांना विचारली होती.
तसेच किती रुग्णांच्या नातेवाइकांनी तशी तक्रार केली होती. त्यावेळी आपत्कालीन पोलिस अहवालामध्ये सहा प्रकरणाची नोंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले.