Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोकणात आणखी ६ ग्रोथ सेंटर्स; पर्यटन, कृषी व्यवसायाला मिळणार चालना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 13:16 IST

एमएसआरडीसीकडे जबाबदारी

मुंबई : कोकणात आणखी सहा ठिकाणी ग्रोथ सेंटर अर्थात विकास केंद्र उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची आता विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रायगडमधील लोणेरे, हरीहरेश्वर, रत्नागिरीतील केळवत, हर्णे आणि भाट्ये आणि सिंधुदुर्गातील बांदा येथील तब्बल १०६ गावांमध्ये ही विकास केंद्र तयार केली जाणार आहेत. त्या माध्यमातून कोकणच्या विकासाला चालना मिळणार आहे.राज्याला ७२० किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे. मात्र, नैसर्गिक साधनसंपत्ती विपुल असूनही कोकणाचा संतुलित असा विकास झाला नाही. कोकणात सुंदर समुद्रकिनारे, प्राचीन मंदिरे, किल्ले आणि अन्य पर्यटन स्थळे आहेत. तसेच हापूस आंबा, काजू, नारळ आणि सुपारीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. निसर्ग संपन्न कोकणाचा विकास साधण्यासाठी आता विकास केंद्र उभारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

राज्य सरकारने कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०५ गावांमधील ४४९.८३ चौरस किमी क्षेत्राकरिता १३ विकास केंद्र उभारण्यासाठी यापूर्वी एमएसआरडीसीची नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली होती. आता त्यात आणखी सहा केंद्रांची भर पडली आहे.या केंद्रांच्या माध्यमातून स्थानिक रोजगार निर्मितीसाठी कृषी उत्पादनांवर आधारित उद्योग, व्यवसाय यांची उभारणी केली जाणार आहे. त्यामध्ये काजू, सुपारी, तसेच अन्य फळांवर प्रोसेसिंग करून त्यांच्यापासून उत्पादने तयार करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच पर्यटनासाठी सुविधांचा विकास केला जाणार आहे. हर्णे येथे पर्यटन, त्याचबरोबर वॉटर स्पोर्ट्स यांना चालना दिली जाईल. याचबरोबर या विकास केंद्रांमध्ये प्रदूषण करणारे कोणतेही उद्योग आणले जाणार नाहीत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

लोणेरे येथे होणार एज्युकेशन हबलोणेरे येथील २५ गावांमध्ये विकास केंद्र उभारले जाणार आहे. या विकास केंद्रात प्रामुख्याने शिक्षण संस्थांच्या उभारणीला चालना देण्याचा विचार आहे. त्यातून वैद्यकीय, हॉस्पिटॅलिटी, स्पोर्ट्स अशा विविध प्रकारच्या शिक्षण संस्थांच्या उभारणीच्या अनुषंगाने सोयीसुविधांचा विकास केला जाणार आहे.

हरीहरेश्वरला धार्मिक पर्यटनाला चालना देणारहरीहरेश्वरला दक्षिण काशी म्हटले जाते. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. येथील गावांमध्ये सावित्री नदी समुद्राला मिळते. त्यातून समुद्राचे विलोभनीय दृश्य दिसते. त्या अनुषंगाने या विकास केंद्रात धार्मिक पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे.