महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागातील ५५ हेक्टर किनारा पाण्याखाली

By सचिन लुंगसे | Published: September 15, 2022 11:33 AM2022-09-15T11:33:56+5:302022-09-15T11:34:25+5:30

खारफुटी, छोट्या खाड्या, दलदल, किनारपट्टी भाग यांचा समावेश असलेल्या राज्याच्या किनारपट्टीवरील परिसंस्थेची गेल्या तीन दशकांमध्ये धूप झाली असून आणि हा भाग जलमय झाला आहे. या भागाचे आकारमान साधारणत: वानखेडे स्टेडियमच्या दहा पट आहे.

55 hectares of coastal areas of Maharashtra under water | महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागातील ५५ हेक्टर किनारा पाण्याखाली

महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागातील ५५ हेक्टर किनारा पाण्याखाली

Next

मुंबई : सॅटेलाइट प्रतिमांच्या आधारे संशोधकांना रायगड जिल्ह्यातील देवघरच्या किनारपट्टीचा ५५ हेक्टरचा भाग पाण्याखाली गेल्याचे आढळून आला आहे. या भागाचे आकारमान साधारणत: मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या दहा पट आहे.

पुण्यातील सृष्टी कन्झर्व्हेशन फाउंडेशन (एससीएफ) ही संस्था, समुद्राची पातळी वाढल्याने होणारी क्षार जमिन आणि किनारपट्टीची होणारी धूप या विषयावर धोरणकर्त्यांना धोरण ठरविण्यासाठी सहाय्य व्हावे यादृष्टीने संशोधन करत आहे. या संशोधनादरम्यान बाणकोट खाडीच्या मुखाशी केलेल्या अभ्यासात प्राथमिक आकडेवारीनुसार १९९० ते २०२२ या कालावधीत सुमारे ५५ हेक्टरची किनारपट्टीवरील परिसंस्था नष्ट झाली आहे असे आढळले. यामध्ये  खारफुटी, छोट्या खाड्या, दलदली, वाळूचे किनारे यांचा समावेश आहे आणि जवळपास ३०० मीटर किनाऱ्याची धूप झाली आहे.

एससीएफ महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागावर सॅटेलाइट डेटासेट्स विकसित करुन तपशीलवार अहवाल तयार करत आहे. गेल्या वर्षी, मुंबई महानगर क्षेत्रालगत असलेल्या खाड्या व जलमार्गांची रुंदी कमी होण्यासंदर्भातील मूल्यमापन आणि करंजा खाडीलगतच्या ६० चौ. फुटांहून अधिक खारफुटीचे क्षेत्र आकुंचित झाल्याचा अहवाल एसएसीएफने प्रकाशित केला होता.

१९९० पासून देवघरच्या किनाऱ्याची कशा प्रकारे हळूहळू धूप होत आहे, या संदर्भातील माहिती देवघरमधील रहिवाशांनी दिल्यावर हा ताजा अभ्यास हाती घेण्यात आला. १९९० पासून किनारपट्टीची धूप होण्याची तीव्रता किती आहे हे निश्चित करण्यासाठी संशोधकांनी प्राथमिक विश्लेषण केले आणि या दाव्याची पडताळणी करण्यासाठी गुगल अर्थ इंजिनचा वापर करून लँडसॅट (सॅटेलाइट) डेटासेट्स गोळा केले.

“सॅटेलाइटने निश्चित केलेला किनारा (पर्यवेक्षण न केलेली वर्गीकरणावर आधारित जलाशयाची सीमा) ३०० ते ५०० मीटर जमिनीच्या बाजूला सरकला आहे, असे निरीक्षणाअंती दिसून आले. या व्यतिरिक्त किनारपट्टीची धूप झाल्यामुळे खारफुटी आणि सुरूची झाडेही उन्मळून पडली.”, असे एससीएफचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दीपक आपटे म्हणाले.

संशोधन स्थळावरील परिणाम
सध्याच्या घडीला, देवघर किनाऱ्याच्या उत्तर-दक्षिण पट्ट्यात सुरूचे बन विस्तारलेले आहे. पण किनारपट्टीच्या भागातील गाळाच्या जागेची सातत्याने धूप झाल्यामुळे सुरुची झाडे नष्ट होत आहेत. मातकट गाळाची जागा, खरखरीत वाळूने घेतल्याचे दिसून येते, असे या विश्लेषणात म्हटले आहे.

२०२० मध्ये देवघरच्या किनाऱ्यालगत आलेल्या निसर्ग चक्रि‍वादळामुळे झाडे, झुडुपे आणि अॅव्हिसेनिया मरिनासारख्या खारफुटी (सुमारे ५ हेक्टर) नष्ट झाल्या. “या पैकी काही पट्टे आता पूर्ववत होत आहे, पण खारफुटीचा मोठा भाग नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या ठिकाणी असलेला गाळ चिखलरुपात नसून त्याचे वाळूरुपात परिवर्तन झाल्याने बहुधा ही परिस्थिती ओढवली आहे”,असे आपटे म्हणाले.

अभ्यासाच्या ठिकाणावरून मिळालेले धडे
राज्यातील अनेक भागांमध्ये किनारपट्टीच्या रचनेत हळूहळू बदल होत आहे आणि याचे व्यवस्थित मूल्यमापन होणे गरजेचे आहे, असे या अभ्यासातून सुचविण्यात आले आहे. उदा. अनेक भागांमध्ये खाऱ्या पाण्याचा शिरकाव शेतजमिनींमध्ये झाल्याने तेथे खारफुटी वाढत आहेत तर काही भागांमध्ये गाळ वाहून गेल्याने जमिनीची मोठ्या प्रमाणावर धूप झाली आहे. 

“हवामान बदलामुळे समुद्राची पातळी वाढल्याने ही परिस्थिती अधिक बिकट होणार आहे. सागरीकिनारपट्टीच्या बदलत्या भूभाग रचनेला हाताळण्यासाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे आणि त्याच्या शास्त्रीय अभ्यासाठी सरकारने पावले उचलणे आवश्यक आहे. सरकारतर्फे केल्या जाणाऱ्या या उपाययोजना तात्पुरत्या स्वरुपाच्या असून, त्यामुळे परिस्थिती आणखी चिंताजनक होईल,” असे आपटे म्हणाले. त्यांनी सांगितले की, खारजमीन बांधांचा (kharland bunds) मोठ्या प्रमाणावर वापर करण्यास प्रोत्साहन दिले जाते, ज्यामुळे खारफुटीची झाडे मरतात. सर्वच ठिकाणी धूप थांबविण्याचा हा शाश्वत उपाय नाही.  

एससीएफने निसर्ग चक्रीवादळाचा खारफुटी असलेल्या व खारफुटी नसलेल्या भागावर झालेल्या परिणामांचा अभ्यास केल्यानंतर वादळ आणि चक्रीवादळांदरम्यान खारफुटींची उपयुक्तता दिसून आली. “अनियंत्रितपणे समुद्रालगत भिंती बांधल्यामुळे धूप होण्याची समस्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरित होते. ज्या किनाऱ्यांवर अतिप्रमाणात धूप होत आहे, तिथे ही तात्पुरती उपाययोजना ठरू शकेल पण हा एकमेव उपाय असता कामा नये”, असे आपटे म्हणाले.

अलीकडेच, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीने किनाऱ्यावरील धूप या विषयाचे विस्तृत विश्लेषण केले. त्यानुसार १९९० ते २०१८ या कालावधीत महाराष्ट्रातील २५.५% किनारपट्टीच्या भागाची धूप झाल्याचे मांडण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारचा अभियांत्रिकी हस्तक्षेप करण्याआधी धूप होण्याच्या समस्येचा सर्वांगीण विचार होणे आवश्यक आहे, असे या अभ्यासात सूचित करण्यात आले आहे.

अभ्यास केलेल्या ठिकाणाला असलेले धोके
देवघर किनाऱ्याचा भाग बाणकोट खाडीच्या जवळ आहे. या ठिकाणी वाळू उत्खनन चालते. वाळू उत्खननाचा देवघर भागातीतल किनारपट्टीवरील जमिनीची धूप होण्यावरील परिणाम सध्याच्या घडीला स्पष्ट नाही. अनियंत्रित वाळू उत्खननामुळे महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या अनेक भागांमध्ये धूप झाली आहे. उदा. अलिबाग व मांडव्यादरम्याच्या अनेक पट्ट्यांमध्ये अनाधिकृत वाळू उत्खनन चालते. त्यामुळे किनाऱ्याची पूर्णपणे धूप झाली आहे.

“एकीकडे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत आहे आणि दुसरीकडे किनारपट्टीच्या भागात वाळूचे उत्खनन केल्यामुळे किनाऱ्याचा नैसर्गिक चढ सपाट होत चालला आहे. त्यामुळे समुद्राचे पाणी गावांमध्ये अधिक वेगाने शिरु लागले आहे.  खाडीची खोली सतत होत असलेल्या वाळूच्या उत्खनानामुळे वाढत आहे, त्यामुळे भरतीच्या व वादळाच्या वेळी अधिक पाणी वाहून क्षमतेमुळे किनाऱ्यावरील अनेक भाग क्षारयुक्त होत आहेत. परंतु पावसाळ्यातील अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी खाड्या खोल होणे आवश्यक असले तरी हे प्रत्येक ठिकाणानुसार बदलत असते आणि हे काम अत्यंत काळजीपूर्वक करण्याची गरज आहे,” असे आपटे म्हणाले.

देवघरमध्ये किनारपट्टीच्या भागाची धूप होण्यास पुलांचे बांधकाम व संबंधिक कामेही कारणीभूत आहेत, असे अभ्यासात आढळून आले आहे.  

या अभ्यासात सुचविण्यात आलेले प्राथमिक उपाय
- हवामान बदलामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्याने होणाऱ्या क्षार जमिनीचे प्रमाण वाढले तर पुढील काही दशकांमध्ये किनारपट्टीवरील मालमत्ता, गुंतवणूक व किनारपट्टीवरील नागरिकांसाठी धोका निर्माण होत आहे. म्हणून राज्याने किनारपट्टी व्यवस्थापन धोरणावर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. अशा प्रकारचे धोरण आखण्यासाठी अत्याधुनिक विज्ञानाचा उपयोग करून घेणे महत्त्वाचे आहे.
- बदलत्या हवामानाच्या आव्हानांना सामोरे जाण्याकरता नागरिकांचा सहभाग असलेली जनजागृती करणे अत्यंत गरजेची आहे.  
- इष्टतम खोली व जलपातळी राखण्यासाठी खाडीभागात शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करणे.
- खारबंधारे धोरणाचा आढावा घेणे. खाऱ्या पाण्याच्या शिरकावाला प्रतिबंध करण्यासाठी बांध बांधल्याने समस्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरित होईल आणि खारफुटी मोठ्या प्रमाणावर नष्ट होईल.
- समुद्रालगत बांधलेल्या भिंतींची उपयुक्तता व त्या आजूबाजूच्या परिसरातील किनाऱ्यांची झालेली धूप पडताळून घेणे गरजेचे आहे.

Web Title: 55 hectares of coastal areas of Maharashtra under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.