महापालिकेच्या ५३ घरांना खरेदीदार मिळेना; खासदार, कलाकार, पत्रकार कोट्यातील घरांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 12:44 IST2025-12-20T12:44:21+5:302025-12-20T12:44:37+5:30
मुंबई महापालिकेने काढलेल्या ४२६ घरांच्या लॉटरीत ५३ घरांना अर्जदारांचा प्रतिसादच मिळालेला नाही. त्यामुळे ती विक्रीविना राहिली आहेत.

महापालिकेच्या ५३ घरांना खरेदीदार मिळेना; खासदार, कलाकार, पत्रकार कोट्यातील घरांचा समावेश
मुंबई : मुंबई महापालिकेने काढलेल्या ४२६ घरांच्या लॉटरीत ५३ घरांना अर्जदारांचा प्रतिसादच मिळालेला नाही. त्यामुळे ती विक्रीविना राहिली आहेत. यात सर्वाधिक घरे आमदार-खासदार, पत्रकार, कलाकार, माजी सैनिक यांच्यासाठी राखीव असलेल्या कोट्यातील आहेत. याशिवाय ३६२ अर्जदार या प्रक्रियेदरम्यान प्रतीक्षा यादीवर आहेत.
महापालिकेतर्फे पहिल्यांदाच म्हाडाच्या धर्तीवर अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी घरांची सोडत काढण्यात आली. घरे महागडी असतानाही मोक्याच्या जागी असलेल्या या घरांसाठी दोन हजार १५७ अर्ज आले. शनिवारी पालिका मुख्यालयात ऑनलाइन पद्धतीने सोडत काढली असून, यात ३७३ अर्जदारांचे घरांचे स्वप्न पूर्ण झाले. ४२६ घरांसाठी काढण्यात आलेल्या सोडतीतील ५३ घरांना प्रतिसाद न मिळाल्याने ती विक्रीविना आहेत. राहिली आहेत. ही घरे गोरेगाव, जोगेश्वरी, भायखळा आणि कांजूर येथील आहेत. यात आमदार-खासदार, पत्रकार, कलाकार, स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक कोट्यातील घरे आहेत. पत्रकारांसाठी दोन घरे राखीव होती, मात्र त्यांना प्रतिसाद न मिळालेला नाही.
कोणती घरे विक्रीविना
एससी - १२
डीटी - ०१
पत्रकार - ०२
डिफेन्स - ०४
माजी सैनिक - १२
आमदार - खासदार - ४
कलाकार - ०३
स्वातंत्र्य सैनिक - ०२
इतर - १३
विजेत्याकडून घर परत
भांडुप येथील लालबहादूर शास्त्री मार्गावरील घर संबंधित विजेत्याने महाग असल्याने परत केले आहे. आर्थिक अडचणीमुळे रक्कम भरणे शक्य नसल्याचे कारण संबंधिताने दिले आहे.