51 Mumbaikar Abhiyan: Select representatives of NGOs in ward committees | ५१ मुंबईकर अभियान : प्रभाग समित्यांमध्ये स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची निवड करा

५१ मुंबईकर अभियान : प्रभाग समित्यांमध्ये स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची निवड करा


मुंबई : कोरोनामुळे महापालिकेतील वैधानिक समित्यांबरोबर  १७ प्रभाग समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या. सहा महिने रखडलेल्या नियुक्त्या १४  ते १६ ऑक्टोबर दरम्यान झाल्या. या निवडणुकाद्वारे १७ प्रभाग समिती अध्यक्षांची निवड करण्यात आली. यात महापालिका राजकीय बलानुसार अध्यक्ष निवडले गेले. मात्र प्रत्येक प्रभाग समितीमध्ये तीन स्वयंसेवी समाजलक्षी संस्था संघटनांच्या प्रतिनिधींची नियुक्ती करण्याचा विसर मुंबई महापालिकेस  २०१७ पासून पडला आहे.

मुंबईतील सामाजिक क्षेत्रातील अनेक वर्षापासून कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी  संस्था या महापालिकेच्या कारभारात नेहमीच सहकार्य करीत खारीचा वाटा उचलत असतात. नुकताच याचा प्रत्यय, कोरोनामुळे लागलेल्या टाळेबंदीच्या वेळी शहरी बेघरांना, स्थलांतरित मजुरांना, गरजवंत नागरिकांना आणि मनपा प्रशासनाला मदत करताना या सामाजिक  संस्था ठळकपणे दिसून आल्या. मुंबई महापालिकेच्या आत्ताच्या १७ प्रभाग समित्यांमध्ये सक्रीय सहभागीतेसाठी या स्वयंसेवी सामाजिक संस्थानी पुढाकार घेत ५१ मुंबईकर अभियानाची सुरुवात केली आहे.  या अभियानाच्या वतीने तत्कालीन महापौर, आयुक्त आणि मुख्य चिटणीस यांना मागील २ वर्षांपासून प्रत्यक्ष भेटीद्वारे निवेदने देऊन नियुक्तीची प्रक्रिया चालू करण्याची विनंती करीत आहेत.

मुंबई मनपाचा कारभार लोकसहभागातून पारदर्शी आणि उत्तरदायी होण्यासाठी ५१ मुंबईकर अभियान तर्फे प्रयत्न सुरु करण्यात आले आहे. दरम्यान, फेब्रुवारी २०१७ च्या मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीनंतर साधारणतः सहा महिन्याच्या कालावधीमध्ये प्रभाग समिती कार्यान्वित होऊन कामकाज सुरू झाले. मात्र ज्या महापालिका अधिनियम १८८८ नुसार मुंबई महापालिकेचे कामकाज चालते त्या कायद्याच्या अधिनियमातील स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी नियुक्तीच्या तरतुदीचे पालन केले नाही.

--------------------

२००२ ते २०१६ पर्यंत कायद्याच्या तरतुदीनुसार १६ प्रभाग समित्यांमध्ये प्रत्येकी ३ प्रमाणे स्वयंसेवी संघटनांच्या प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्त प्रतिनिधींनी अपेक्षित लोकसहभाग, पारदर्शी कारभाराची मागणी आणि उत्तरदायित्व आणण्यासाठी भरीव काम केल्याची अनेक उदाहरणे दिसून आली आहेत. मात्र याच कायद्यातील तरतुदींचा आधार घेत आपल्याच राजकीय पक्षप्रणित विचारांच्या आणि सोयीच्या कार्यकर्त्यांना ‘अळीमिळी गुपचिळीसाठी’ निवडण्याचा प्रघात सुरु झाला.
 
- सीताराम शेलार, निमंत्रक, ५१ मुंबईकर अभियान

--------------------

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 51 Mumbaikar Abhiyan: Select representatives of NGOs in ward committees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.